हवा गुणवत्ता निर्देशांक ‘वाईट’ श्रेणीत
| रायगड | प्रतिनिधी |
कोकणातील प्रमुख पर्यटनस्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अलिबाग शहरावर सध्या प्रदूषणाचे गंभीर संकट ओढावले आहे. अलिबागमधील हवा गुणवत्ता निर्देशांक ‘वाईट’ श्रेणीत नोंदवला गेला आहे. ‘वेदर डॉट कॉम’च्या माहितीनुसार, हा निर्देशांक 225 पर्यंत पोहोचला होता, तर ‘एमएसएन वेदर रिपोर्ट’वर तो 219 दर्शवण्यात आला आहे.
अलिबागमध्ये आर्द्रतेचे प्रमाण अधिक असल्यामुळे हवेत प्रदूषक घटक साचून राहतात. त्यातच शहर आणि परिसरात सुरू असलेली मोठ्या प्रमाणावरील बांधकामे, रस्त्यांची कामे तसेच औद्योगिक प्रकल्पांतून होणारे उत्सर्जन यामुळे हवेचा दर्जा अधिकच खालावत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून हवा गुणवत्ता निर्देशांक सातत्याने 100 च्या वर नोंदवला जात आहे.
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निकषांनुसार 0 ते 50 ‘चांगली’, 51 ते 100 ‘समाधानकारक’, 101 ते 200 ‘मध्यम’, 201 ते 300 ‘वाईट’, 301 ते 400 ‘अत्यंत वाईट’ आणि 400 पेक्षा जास्त ‘अतिधोकादायक’ हवा गुणवत्ता मानली जाते. भारतीय हवामान विभागाने अलिबाग शहरासाठी कोरड्या वातावरणाचा अंदाज वर्तवला आहे. येत्या दिवसांत कमाल तापमान 30 अंश सेल्सिअसच्या आसपास, तर किमान तापमान 16 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. पावसाळ्यानंतर कोकणातील वाऱ्यांचा वेग मंदावल्याने हवेत साचलेली धूळ व प्रदूषक घटक बाहेर फेकले जात नाहीत. त्यामुळे बाष्पामुळे धुलीकण हवेतच तरंगत राहतात.
यासोबतच पायाभूत सुविधा, रहिवासी व व्यावसायिक संकुलांची बांधकामे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. या कामांमधून उडणारी धूळ हवेचा दर्जा ढासळण्यास कारणीभूत ठरत आहे. भात कापणीनंतर शेतात उरलेली भाताची मुळे जाळणे, डंपिंग ग्राऊंडवर कचरा जाळण्याच्या घटना यामुळेही प्रदूषणात भर पडत आहे. शनिवार-रविवारी पर्यटकांची संख्या वाढल्याने वाहनांची वर्दळ वाढते. वाहनांमधून बाहेर पडणाऱ्या धुरातील अतिसूक्ष्म कण वातावरणातील प्रदूषण अधिक तीव्र करतात.
हवा प्रदूषण वाढल्यास घ्यावयाची काळजी
प्रदूषणामुळे श्वसनसंस्थेचे व त्वचेशी संबंधित आजार उद्भवू शकतात. सकाळी व सायंकाळी धुरक्याचे प्रमाण अधिक असल्याने त्या वेळेत घराबाहेर पडणे टाळावे. गर्दीच्या ठिकाणी जाणे शक्यतो टाळावे. थंड पेये व तेलकट पदार्थांचे सेवन करू नये. लहान मुले, वयोवृद्ध व आजारग्रस्त व्यक्तींनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.






