| पोलादपूर | वार्ताहर |
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटाला पर्यायी भुयारी मार्ग असलेल्या भोगाव येथील भुयारी मार्गाकडे जाणाऱ्या गणेशभक्त चाकरमान्यांना निसर्ग सान्निध्यातून मार्गाक्रमण करताना अचानक डांबरप्लांटमधून धूर ओकणाऱ्या धुरामुळे, तसेच काँक्रीटीकरणाला पडलेल्या तडे व खड्डयांवर अंथरलेल्या दगडी भुकटीमुळे धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे.
कोंढवी फाटयापासून काही अंतरावरील वनवे फलकापासून डावीकडे कशेडी घाटाला पर्यायी भुयारी मार्गाचा रस्ता कशेडी घाटात सात कि.मी. अंतरापर्यंत वाहने गेल्यानंतर अचानक काही अंतरावर डांबराचा प्लांट धूर ओकत असल्याने चाकरमान्यांना डोळयांना जळजळ तसेच जीव गुदमरला. यानंतर एका पुलावर काँक्रीटीकरणाला तडे आणि खड्डे पडल्याने ते बुजविण्यासाठी ग्रीट पसरली असून पुढे जाणाऱ्या वाहनांमुळे निर्माण होणाऱ्या वाऱ्यासोबत ही ग्रीट हवेत उडत असल्याने अनेकांना नाका-तोंडात ही ग्रीट जात असल्याचा अनुभवही घ्यावा लागला. अशातच, कातळी गावाच्या हद्दीतील भुयारी मार्गाजवळ आल्यानंतर वायुविजन अभावी भुयारी मार्गातून प्रवास करणाऱ्यांना धूर आणि धुळीचा त्रास झाला.