पाँटिंग-गांगुलीचा पंचांशी वाद; नक्की झालं काय?

| मुंबई | वृत्तसंस्था |

इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेत नववा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात पार पडला. जयपूरला झालेला हा सामना राजस्थान रॉयल्सने 12 धावांनी जिंकला. दरम्यान, या सामन्यात एका नियमावरून गोंधळ झाल्याने काही वेळासाठी अडथळा आला होता.

राजस्थान रॉयल्सने दिल्ली कॅपिटल्सकसमोर 186 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीकडून डेव्हिड वॉर्नरने सुरुवातीचे दोन चेंडू खेळले. दोन चेंडूनंतर दिल्ली कॅपिटल्सचा मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग आणि क्रिकेट संचालक सौरव गांगुली फोर्थ अंपायरशी काहीतरी रागात बोलताना दिसले. त्यांनी चार परदेशी खेळाडूंच्या नियमावरून चर्चा केली. राजस्थान रॉयल्सने चार नाही, तर पाच खेळाडू खेळवले असा समज झाल्याने दिल्ली कॅपिटल्सने शंका उपस्थित केली होती. त्यांचा नियमाबाबत गोंधळ झाला होता. मात्र, नंतर पंचांनी संघाची शीट दाखवत त्यांचा गोंधळ दूर केला.

राजस्थान रॉयल्सने सुरुवातीच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये जॉस बटलर, शिमरॉन हेटमायर आणि ट्रेंट बोल्ट यांना संधी दिली होती. त्यानंतर दुसऱ्या डावात त्यांनी इम्पॅक्ट प्लेअर म्हणून हेटमायरच्या जागेवर नांद्रे बर्गरला संधी दिली. तसेच दुसऱ्या डावात क्षेत्ररक्षणासाठी शुभम दुबे बाहेर गेल्याने रोवमन पॉवेल त्याच्या जागेवर केवळ क्षेत्ररक्षणासाठी बदली क्षेत्ररक्षक म्हणून मैदानात आला . परंतु, दिल्ली संघाचा असा गैरसमज झाला की राजस्थान पाच परदेशी खेळाडूंना खेळवत आहे. पण खरंतर क्षेत्ररक्षणावेळी मैदानात राजस्थानकडून केवळ चार परदेशी खेळाडू क्षेत्ररक्षण करत होते. बर्गर हेटमायरऐवजी इम्पॅक्ट प्लेअर म्हणून संघात आल्याने हेटमायर मैदानात नव्हता. त्यामुळे मैदानात बर्गर, बोल्ट, बटलर आणि पॉवेल हे चारच परदेशी खेळाडू मैदानात होते. दरम्यान, नियम पाँटिंग आणि गांगुलीला समजावल्यानंतर पुन्हा खेळ सुरू झाला.

आयपीएलच्या नियमानुसार कोणताही संघ प्लेइंग इलेव्हनमध्ये चार पेक्षा जास्त परदेशी खेळाडू खेळवू शकत नाही. जर संघाने प्लेइंग इलेव्हनमध्ये आधीच चार परदेशी खेळाडूंना जागा दिली असेल, तर परदेशी बदली क्षेत्ररक्षक केवळ दुसऱ्या परदेशी खेळाडूंच्याच जागेवर मैदानात जाऊ शकतो.

Exit mobile version