| अलिबाग | वार्ताहर |
अलिबाग-वडखळ मार्गाची अवस्था दिवसेंदिवस अधिकच दयनीय होत चालली आहे. या रस्त्यावर जागोजागी मोठमोठे खड्डे पडले असून, प्रवासी जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहेत. वाहनधारकांचा त्रास तर वाढलाच आहे, मात्र सामान्य नागरिकांचा संयमही आता संपत चालला आहे. निवडणूकींच्या आधी विकासाचे गोडगोड आश्वासने देणारे लोकप्रतिनिधी निवडून आल्यावर मात्र त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे ‘अपना काम बनता, खड्ड्यात जावो जनता’ अशी त्या लोकप्रतिनिधींची भावना झाल्याची चर्चा जोर धरत आहे.
अलिबाग-पेण मार्गाच्या चौपदरी कारणाचा प्रस्ताव काही वर्षांपूर्वी आला होता. प्रकल्पाला येणारा खर्च परवडत नसल्याच्या कारणावरून तो बासनात गुंडाळण्यात आला. रस्त्यावर पडलेला प्रत्येक खड्डा पार करताना वाहन चालकांना प्रचंड शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्यावरून प्रवास करणारा प्रत्येक प्रवासी हा मतदार असूनही लोकप्रतिनिधी त्यांच्याकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत, असा संताप प्रवासी वर्गातून व्यक्त होत आहे. तसेच, दर निवडणुकीत रस्त्यांचे, विकासाचे गोडगोड आश्वासन देणारे लोकप्रतिनिधी आता मात्र गायब झालेत, अशी भावना देखील स्थानिक जनतेत आहे.
मुळात हा रस्ता शासनाच्या कुठल्या विभागाकडे आहे, हेच शासनाला माहिती नाही. सर्वच विभाग याबाबत टोलवाटोलवी करत आले आहेत. त्यामुळे या रस्त्याचे चौपदरीकरण दूरच राहिले, किमान रस्त्याची डागडुजी तरी करा. प्रशासन व लोकप्रतिनिधींनी त्वरित लक्ष देऊन अलिबाग-पेण मार्गाची डागडुजी व डांबरीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू करावे, अन्यथा जनतेच्या रोषाचा सामना करावा लागेल. सामान्य जनतेची मानसिक स्थिती बदलून त्याच्याकडून काहीतरी अघटीत घडण्याआधी किमान या रस्त्याची डागडुजी होईल, अशी अपेक्षा स्थानिकांसह प्रवासी वर्गातून व्यक्त होत आहे.







