माणगाव-पुणे घाटरस्त्याची दुरवस्था ; दुरुस्तीसाठी वाली कोण?

वाहनचालक त्रस्त
श्रीवर्धन | वार्ताहर |
माणगाव-ताम्हिणी-पुणे या मार्गावरील घाटरस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून, अपघात होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. परंतु, हद्दीच्या वादात सापडलेल्या रस्त्याचे दुरुस्ती नक्की कोणी करायची? या वादात रस्त्याची पुरती वाट लागली आहे. वाहन चालविण्यालायक न राहिलेल्या रस्त्यामुळे वाहनचालकांमधून संताप व्यक्त होत आहे.
या महामार्गावरील पाईप लाईनपासून पुढे गेल्यावर काही अंतरावर साधारणपणे अर्धा किलोमीटर लांबीच्या रस्त्यावर मोठ मोठे आणि भयानक खड्डे पडले आहेत, की सर्व चार चाकी वाहनांना तेथे थांबल्याशिवाय पुढे जाणे अशक्य होते. हे खड्डे खोलही असल्यामुळे वाहने तेथे आपटतात. रस्त्याचा हा भाग पुणे जिल्ह्याच्या हद्दीत येतो, असे समजते.
या रस्त्याच्या पुढे-मागे पावसाळ्यात धबधबेही असल्यामुळे तेथे पर्यटकांची गर्दीही असते. तरी या भयानक दुर्दशा झालेल्या रस्त्याची दुरुस्ती केव्हा होणार? कोण करणार? नक्की या रस्त्याचा वाली कोण? असे अनेक प्रश्‍न उपस्थित होतात. या रस्त्याच्या दुर्दशेकडे कोणीतरी लवकरात लवकर लक्ष देऊन प्रवासी, वाहनचालक यांना या कसरतीतून मुक्त करावे, अशी अपेक्षा ही परिस्थिती पाहणार्‍यांकडून व्यक्त होते.

Exit mobile version