आ.जयंत पाटील यांचा विधानपरिषदेत मुद्दा
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
पेण तालुक्यातील पोलीस वसाहत इमारतीची दुरुस्ती करण्याबाबत दुरवस्थेत असलेल्या धोकादायक इमारतीत पोलीस कुटुंबिय वास्तव्य करीत असल्याने त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे पोलीस कर्मचार्यांचे अनेक कुटुंब इतर ठिकाणी भाड्याच्या घरात वास्तव्य करीत आहेत. ही गंभीर बाब आ जयंत पाटील यांनी सभागृहात निदर्शनास आणल्या नंतर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सदर वस्तुस्थिती मान्य करीत याबाबत पेण येथील नवीन शासकीय निवासस्थानांचे बांधकाम करण्याबाबतचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक, रायगड यांचेकडून पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य व व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ, मुंबई प्राप्त झालेला आहे. सदर प्रकल्पास प्राधान्यक्रम ठरविण्याची कार्यवाही सुरु असल्याचे स्पष्ट केले.
आ जयंत पाटील यांनी सभागृहात प्रश्न उपस्थित केला की, पेण (जि.रायगड) तालुक्यातील पोलीस वसाहत शासकीय गोदाम असलेल्या ठिकाणी 20 वर्षापूर्वी बांधण्यात आली असून सद्य:स्थितीत या वसाहतीची दुरवस्था झाली असून येथील इमारती व दोन बैठ्या चाळी जीर्ण झाल्या असल्याचे माहे जानेवारी 2022 मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे. दुरवस्थेत असलेल्या धोकादायक इमारतीत पोलीस कुटुंबिय वास्तव्य करीत असल्याने त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे तर अनेक कुटुंब इतर ठिकाणी भाड्याच्या घरात वास्तव्य करीत आहेत.
सदर वसाहतीच्या दुरुस्तीबाबतचा प्रस्ताव रायगड जिल्हा अधीक्षकांकडून शासकीय पोलीस महासंचालकांकडे पाठविण्यात आलेला असून व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाला देखील कळविण्यात आलेले असूनही अद्याप त्यासाठी निधी उपलब्ध झालेला नसल्या बाबत देखील जयंत पाटील यांनी सभागृहात प्रश्न उपस्थित केला. तसेच उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीच्या अनुषंगाने पेण तालुक्यातील पोलीस वसाहतीच्या दुरुस्ती/नुतनीकरणासाठी निधी उपलब्ध करून वसाहतीचे नुतनीकरण करण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे.अशी विचारणा करण्यात आली आहे.
त्यावर उत्तर देताना गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सदर वस्तूस्थिती मान्य करत सार्वजनिक बांधकाम विभाग, अलिबाग यांनी वापरण्यास योग्य नसल्याने व पाडण्यास हरकत नसल्याचे कळविलेल्या फणसडोंगरी, पेण येथील नादुरुस्त असलेल्या इमारती बैठ्या चाळीमध्ये कोणीही वास्तव्यास नाही. तसेच स्ट्रक्चरल ऑडीट करण्याचे काम प्रगतीपथावर असलेल्या पूर्वेकडील भागातील इमारतीमधील 5 खोल्यांमध्ये पोलीस अंमलदार त्यांचे कुटुंबियांसहित वास्तव्य करीत आहे. तसेच पेण येथील अनेक पोलीस अधिकारी व कर्मचारी हे खाजगी जागेमध्ये त्यांचे
कुटुंबियांसमवेत वास्तव्य करीत आहेत. पेण येथील सध्याच्या पोलीस वसाहतीची जीर्णावस्था झालेली असल्याने पेण येथील नवीन शासकीय निवासस्थानांचे बांधकाम करण्याबाबतचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक, रायगड यांचेकडून पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य व व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ, मुंबई प्राप्त झालेला आहे. सदर प्रकल्पास प्राधान्यक्रम ठरविण्याची कार्यवाही सुरु आहे असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.