पालीत सार्वजनिक शौचालयाची दुरवस्था

ग्रामस्थांची दुरुस्तीची मागणी
। सुधागड-पाली । वार्ताहर ।
सुधागड तालुक्यातील अष्टविनायक क्षेत्रापैकी पाली नगरपंचायतीच्या हद्दीतील आगर आळी येथील शौचालयांची दुरवस्था झाली आहे. शौचालयाला नाही दरवाजा, छपरचे पत्रे तुटलेल्या अवस्थेत आहेत. स्वच्छता नसल्याने जागोजागी दुर्गंधी व घाणीचे साम्राज्य पसरले आहे. आगर आळी येथील नागरिक तसेच बाहेरून येणार्‍या लोकांची गैरसोय होत आहे. काही शौचालयांच्या आतून कड्या तुटलेल्या असून आजुबाजुचा परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे.
संबंधित विभागाचे शौचालयाकडे दुर्लक्ष होत असल्याने परिसरातील ग्रामस्थ पाली नगरपंचायतीच्या कारभाराबद्दल संताप व्यक्त करीत आहे. शौचालयाच्या परिसरामध्ये ठिकठिकाणी प्रचंड कचरा साठलेला आहे. या घाणीमुळे आणि दुर्गंधीमुळे परिसरातील लोकांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. पाली नगरपंचायत हद्दीतील सर्व सार्वजनिक शौचालय लवकरात लवकर दुरुस्त करावी अशी मागणी सर्वसामान्य जनतेतून होत आहे.

Exit mobile version