पोलादपूरात पुनर्वसन संकुलांची दुरवस्था

दरडग्रस्त ग्रामस्थ संकुलात वास्तव्यासाठी अनुत्सुकच
। पोलादपूर । वार्ताहर ।

2005 मध्ये अतिवृष्टी, महापूर आणि दरडग्रस्तांसाठी देण्यात आलेल्या पुनर्वसन संकुलांपैकी पोलादपूर तालुक्यातील कोंढवी आणि कोतवाल येथील पुनर्वसन संकुलांची दुरवस्था दरडग्रस्तांनी ताबा घेतल्यापासूनच सुरू आहे. या पुनर्वसन संकुलांमध्ये वास्तव्यासाठी दोन्ही गांवांतील दरडग्रस्त ग्रामस्थ अनुत्सुक असल्याचे लॉटरीनंतर दिसून आले आहे. पोलादपूर तालुक्यात 2021 मध्ये दरडग्रस्त झालेल्या देवळे ग्रुपग्रामपंचायत हद्दीतील केवनाळे आणि साखर ग्रामपंचायत हद्दीतील सुतारवाडी येथे दरडी कोसळून 11 जणांचा बळी गेल्यानंतर तेथे होऊ घातलेल्या पुनर्वसन संकुलाच्या कामाबाबत पहिल्या वर्षभरातील प्रगतीचा आढावा पाहता दरडग्रस्तांच्या वास्तव्याचा विचार येत्या काही वर्षांमध्ये पूर्णत्वास जाण्यासंदर्भात साशंकता निर्माण होत आहे.


तालुक्यातील पुनर्वसनाच्या पहिल्या टप्प्यात बोरावळे येथील 9 घरांच्या बांधकामानंतर तेथील दरडग्रस्तांचे पुनर्वसन पूर्ण झाले. सावित्री महिला विकास संस्थेतर्फे पैठण गांवात 3, देवपूर येथे 4, पार्ले येथे 3, माटवण येथे 5, पोलादपूर- जोगेश्‍वरी गाडीतळ येथे 3, सडवली येथे 6, लोहारमाळ येथे 4, रानबाजिरे येथे 23, आड येथे 2, सवाद येथे 1 आणि हावरे येथे 6 अशी एकूण 61 घरकुले बांधण्यात येऊन ताबाही देण्यात आला. पोलादपूर येथील चित्रे यांना घरबांधणीसाठी सरकारी अनुदान देण्यात आले. कोतवाल खुर्द आणि बुद्रुकच्या दरडग्रस्तांसाठी 28 घरकुलं उभी राहतील एवढे क्षेत्र एवढे क्षेत्र उपलब्ध करण्यात येऊन पुनर्वसनाचे प्रयत्न सरकारकडून सुरू झाले. सिध्दीविनायक ट्रस्ट, मुंबईने याकामी खर्चाची जबाबदारी उचलली. कोतवाल खुर्द आणि बुद्रुकच्या दरडग्रस्तांसाठी 28 घरकुलं उभी राहतील एवढे क्षेत्र तर कोंढवी येथे 29 घरकुलं उभी राहतील एवढे क्षेत्र उपलब्ध करण्यात येऊन पुनर्वसनाचे प्रयत्न सरकारकडून सुरू झाले.


मात्र, त्यानंतर कोंढवी आणि कोतवाल येथील घरकुलांच्या परिस्थितीमध्ये सुधारणा होण्याऐवजी ती दिवसेंदिवस खालावत गेली. येथे वीज, पाणी, रस्ते, शाळा अशा मुलभूत सुविधांचा पुनर्वसन कार्यक्रमामध्ये समावेश असूनही त्याबाबत कार्यवाही झाली नाही. यातून ही घरकुलं दरडग्रस्तांना ताबा दिल्याविना ओसाड राहून ढासळू लागली. ठेकेदारांकडून त्याकडे दूर्लक्ष होऊ लागले. दुसर्‍या टप्प्यात मिळालेली रक्कम झालेल्या कामापोटीच मिळाली असे सांगून ठेकेदार त्याठिकाणी फिरकेनासेही झाले. दरडग्रस्त ग्रामस्थांनी पुनर्वसन घरकुलांकडे पाठ फिरविली आहे. सर्वच घरकुलांचे काम पूर्ण होऊनही हस्तांतरीत न झाल्याने घरकुलांची कौले, खिडक्या, भिंती यांचे खुपच नुकसान झाल्याने कोंढवीप्रमाणे कोतवालच्या घरकुलांचादेखील जिर्णोध्दार करण्याची गरज निर्माण झाली आहे. दरडग्रस्तांच्या पुनर्वसनाबाबत 2005 साली निर्माण झालेली मानसिकता आणि राजकीय परिस्थिती आताही दिसून येत असल्याने दरडग्रस्तांना पुनर्वसनाचे गाजर दाखवून 2021 मध्ये दरडग्रस्त झालेल्या देवळे ग्रुपग्रामपंचायत हद्दीतील केवनाळे आणि साखर ग्रामपंचायत हद्दीतील सुतारवाडी येथे याचीच पुनरावृत्ती होणार अथवा कसे, याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.

Exit mobile version