खोंडखोल येथे रस्त्याची दयनीय अवस्था

। तळा । वार्ताहर ।
तळा तालुक्यातील रोवला येथे असलेल्या खोंडखोल आदिवासीवाडीकडे जाणार्‍या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. हा रस्ता मातीचा असल्यामुळे सर्वत्र धुळीचे साम्राज्य पसरलेले असते. तसेच बर्‍याचदा गाडी घसरण्याच्या घटना देखील घडल्या आहेत.
खोंडखोल मुख्य रस्त्यापासून जवळपास दीड किलो मीटर अंतराचा हा रस्ता असून या रस्त्याचे डांबरीकरण झाले नसल्याने या ठिकाणी रिक्षा अथवा मिनिडोअर येत नाही. परिणामी आदिवासी वाडीत एखादी व्यक्ती आजारी पडली तर तिला पाठीवरून उचलून मुख्य रस्त्यापर्यंत आणावे लागते व तेथून गाडी मिळाल्यास आरोग्य केंद्रात दाखल केले जाते. काही वेळेला वेळीच गाडी मिळाली नाही तर रुग्णाच्या जीवास धोका देखील निर्माण होण्याची शक्यता असते. अशातच आता पावसाळा तोंडावर आल्याने या रस्त्यावर सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरणार असून यामुळे अपघात घडण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही. तरी तात्पुरत्या स्वरूपात खडी टाकावी जेणेकरून चिखलामुळे गाडी घसरून होणारे अपघात टळतील अशी मागणी येथील आदिवासी बांधवांकडून करण्यात येत आहे.

Exit mobile version