। नेरळ । वार्ताहर ।
नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील माथेरान डोंगराच्या पायथ्याशी वसलेल्या आनंदवाडी, आंबेवाडी, कोबंळवाडी व नवीवाडीकडे जाणार्या मुख्य रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. त्यामुळे येथील आदिवासी बांधवासह अन्य नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
मोठ्या प्रमाणात दुरवस्था झालेल्या खड्डेमय रस्त्यावरून आपला जीव मुठीत घेऊन खडतर प्रवास करावा लागत आहे. या खडतर प्रवासामुळे मान व कमरेच्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. मात्र, याकडे प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
कर्जत-कल्याण राज्य मार्गाला मोहाची वाडी ते आनंदवाडी असा जोडणारा रस्ता आहे. तर या जोडरस्त्याचे काम हे याआधी शासनाच्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून डांबरीकरण करण्यात आले होते. मात्र या रस्त्याची दूरवस्था झाल्याने नव्याने कर्जत-कल्याण राज्यमार्ग ते मोहाचीवाडी साई मंदिर सिमेंट काँक्रीटचा रस्ता तसेच, मिना पवार यांच्या घरापर्यंतचा सिमेंट काँक्रीट रस्ता हा ग्रामीण रस्ते विकास मजबुतीकरणातून करण्यात आला आहे. मात्र या पुढे आनंदवाडी, आंबेवाडी, कोबंळवाडी व नवीवाडीकडे जाणारा रस्ता मात्र मुख्यमंत्री ग्रामसडक योजनतून डांबरीकरण झाल्यानंतर आज मितीला खड्डेमय परस्थितीमध्ये आहे. या वाडयांवस्त्यांच्या परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिकरण वाढले असल्याने या खड्डेमय रस्त्यावरून येथील आदिवासी वाडीतील आदिवासी बांधवांसह इतर नागरिकांना आपला जीव मुठीत घेऊन खडतर प्रवास करावा लागत आहे. प्रशासन याकडे लक्ष का देत नाही, असा संतप्त सवाल विचारण्यात येत आहे.