तळा बसस्थानकाची दयनीय अवस्था

एसटी महामंडळाने लक्ष देण्याची मागणी

| तळा | प्रतिनिधी |

गैरसोयींचे माहेरघर बनलेल्या तळा बसस्थानकातील समस्या सुटणार तरी कधी? असा प्रश्न आता तळावासीयांना पडला आहे. एवढ्या वर्षानंतरही तळा बसस्थानकाची अवस्था जैसे थे असून गेल्या कित्येक वर्षांपासून तळा बसस्थानकाचा विकास झाला नसल्याने येथील प्रवाशांना अनेक त्रासांना सामोरे जावे लागत आहे. तळा तालुक्यातील दळणवळणाचे मुख्य ठिकाण असलेले तळा बसस्थानक अनेक सोयीसुविधांची कमतरता आहे. तळा तालुक्यात एसटी हे दळणवळणाचे एकमेव साधन असून दिवसभर जवळजवळ 80 ते 85 एसटीच्या फेऱ्या सुरू असतात. त्यामुळे तळा बसस्थानकात प्रवाश्यांची नेहमी वर्दळ असते, मात्र स्थानकात अनेक सोयीसुविधांची कमतरता असल्याने बसस्थानकाची अत्यंत दयनीय अवस्था झाली असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

अद्यापही आवारात काँक्रीटिकरण व पाणपोईची व्यवस्था नाही
2011 च्या दरम्यान आठ लाख रुपये खर्च करून पत्राशेड बांधून तळा येथे बसस्थानक उभारण्यात आले मात्र स्थानकातील आवारात अद्यापही काँक्रीटीकरण करण्यात आलेले नाही. त्यामुळे सर्वत्र धुळीचे साम्राज्य पसरत आहे. येणाऱ्या-जाणाऱ्या तसेच बसस्थानकात बसलेल्या प्रवाशांना या धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे. नूतन बसस्थानक तयार झाल्यापासून आजपर्यंत बसस्थानकात पाणपोईची व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यामुळे येथील प्रवाशांना पिण्यासाठी विकतचे पाणी आणावे लागत आहे. रात्री वस्तीला असलेल्या बस चालक व वाहकांना देखील पिण्यासाठी पाणी उपलब्ध नसल्याने इतरत्र जाऊन पाणी आणावे लागत आहे.
पाण्याअभावी बसस्थानक परिसरात दुर्गंधी
बसस्थानकात असलेल्या नळाला येणारे पाणी नियमित येत नसल्याने येथे असलेल्या शौचालय व मुतारीची दुरवस्था झाली आहे. पाण्याअभावी शौचालय व मुतारीची व्यवस्थितपणे स्वच्छता होत नाही. अस्वच्छतेमुळे काहीजण बाहेरच लघुशंका उरकतात त्यामुळे बसस्थानक परीसरात सातत्याने दुर्गंधी पसरते. येथील नागरिक व महिला प्रवाशांना कायम नाकाला रुमाल बांधून ये-जा करावी लागते.
खडकाळ भागामुळे एसटी लावण्यास अडचण
बसस्थानकासमोरील डाव्या बाजूला असलेला भाग ऊंच व खडकाळ असल्यामुळे चालकाला स्थानकात एसटी लावण्यास अडचण निर्माण होते, तसेच त्याठिकाणी एसटी फिरवून घेणे कठीण जात असल्यामुळे चालक बाहेरच्या बाजूस एसटी लावणे पसंत करतात. परिणामी बाहेर मुख्य रस्त्यावर वाहतूक कोंडीची परिस्थिती उद्भवते. बसस्थानकासमोरील या काँक्रीटीकरणाचे काम महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्या माध्यमातून होणार असल्याचे राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून सांगण्यात आले होते. मात्र अद्याप या काँक्रीटीकरणाचे काम करण्यात आलेले नाही. अशा एक ना अनेक समस्या असून या सर्वांचा त्रास मात्र प्रवाशांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे एसटी महामंडळाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन बसस्थानकात असलेल्या समस्या लवकरात लवकर मार्गी लावाव्या अशी मागणी नागरिक व प्रवाशांकडून केली जात आहे.
Exit mobile version