| कोर्लई | प्रतिनिधी |
‘स्वच्छ मुरुड सुंदर मुरुड’ संकल्पना असलेल्या मुरुड शहरातील कल्याणी हॉस्पिटल रिक्षा स्टँडनजीक असलेल्या शौचालयाची पार दुरवस्था झाली आहे. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न लक्षात घेऊन ते तात्काळ बंद करण्यात यावे. अन्यथा याविरोधात नाईलाजास्तव जन आंदोलन छेडू, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते अरविंद गायकर यांनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सचिन बच्छाव यांना निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
मुरूड शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या कल्याणी हॉस्पिटल शेजारील रिक्षा स्टॅन्ड नजीक शौचालय व प्रसाधनगृहाची भयानक अवस्था झाली आहे. या ठिकाणी सातत्याने मोठ्या प्रमाणावर वर्दळ सुरू असून आजुबाजूच्या परिसरातील नागरिक बाजारहाट व विविध प्रकारच्या कामांसाठी ये-जा करीत असतात. मात्र, त्यांना शौचालयाच्या दुरवस्थेमुळे मोठी गैरसोय होत आहे. तसेच, येथील दुर्गंधीमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते अरविंद गायकर यांनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सचिन बच्छाव यांना निवेदन दिले आहे. त्यात, आरोग्याचा प्रश्न लक्षात घेऊन येथील शौचालय व प्रसाधनगृहाची प्रत्यक्ष पाहणी करून येत्या आठ दिवसांत आपणाकडून योग्य तो निर्णय घेण्यात यावा. अन्यथा जन आंदोलनाच्या माध्यमातून शौचालय प्रसाधनगृह बंद करावे लागेल, असा इशारा देखील त्यांनी दिला आहे. या निवेदनाच्या प्रती नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांनादेखील देण्यात आल्या आहेत.
मुरुड शहरातील शौचालयाची दुरवस्था
