। महाड । वार्ताहर ।
महाड शहरातील सुकट गल्लीत असलेल्या सार्वजनिक स्वच्छतागृहांची दूरवस्था झाली आहे. मनसेचे शहर उपाध्यक्ष दीपक चव्हाण यांनी याबाबत एक निवेदन महाड नगर पालिकेचे मुख्याधिकारी महादेव रोकडे यांना दिले. या ठिकाणी तातडीने नवी स्वच्छतागृहे बांधण्यात यावीत, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या स्वच्छतागृहांच्या देखभाल, दुरुस्तीकडे लक्ष न दिल्याने त्याचप्रमाणे गतवर्षी आलेल्या पुरानंतर या ठिकाणी कोणतीही साफसफाई करण्यात न आल्याने ती वापरण्यायोग्य राहिलेली नाहीत. त्यामुळे परिसरात घाणीचे आणि दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. स्वच्छता गृहांअभावी या परिसरात राहणार्या महिलांना कुचंबणा सहन करावी लागत आहे. ही बाब विचारात घेवून या ठिकाणी त्वरीत नवी स्वच्छतागृहे बांधण्याची मागणी चव्हाण यांनी केली आहे.