| उरण | प्रतिनिधी |
सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारीत असलेल्या नव्याने काही महिन्यापूर्वी तयार करण्यात आलेला उरण करंजा रस्ता निकृष्ट दर्जाच्या कामामुळे रस्ता उखडला असून, रस्त्याची खडी बाहेर आली आहे. तर या मार्गांवर ठिकठिकाणी रस्ताच खराब झाला असल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे.
चाणजे ग्रामपंचायत हद्दीतील करंजा हा नागरिकांसाठी रहदारीचा आहे. उरण-करंजा रस्ता गेले अनेक वर्षे जिल्हा परिषद करेल की सिडको करेल की सार्वजनिक बांधकाम करेल यामुळे खड्ड्यात अडकला होता. उरण करंजा रस्त्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याकडून चार कोटींचा निधी मंजूर करून त्या रस्त्याचे डांबरीकरण आणि काँक्रिटीकरण अशा दोन भागात हा मार्ग नुकताच बनवण्यात आला आहे. त्यामुळे या मार्गांवरून सुखकर प्रवास होईल असे या मार्गांवरील प्रवाशांना वाटले. मात्र, या रस्त्याच्या डांबरीकरणाच्या सुरवाती पासूनच रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामाच्या वादाच्या भोवाऱ्यात सापडला. यावेळी चाणजेचे सरपंच अजय म्हात्रे यांनी निकृष्ट दर्जाच्या कामाची पोलखोल केली होती. त्यामुळे तेथील लेअर नव्याने पुन्हा टाकून बनवून घेतला होता.
नव्याने निर्माण करण्यात आलेल्या रस्त्याची अल्पावधीतच दुरावस्था झाली असून, ठिकठिकाणी हा रस्ता उखडला गेला आहे. रस्त्याच्या आतील खडी बाहेर आली आहे. त्यामुळे या मार्गांवर फक्त वरवर डांबरेचा लेअर टाकला गेला आहे का अशी शंका उपस्थित केली जात आहे. जर ठेकेदाराने बनविलेला चार कोटींचा रस्ता दोन महिन्यातच खराब होत असेल तर या रस्त्याचा निकृष्ट पणा दिसून येत आहे. तरी सदर रस्त्याच्या कामाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सचिन डाऊर यांनी व्यक्त केली आहे.
ठेकेदाराला रस्त्याचा टेंडर मिळाल्यानंतर त्या रस्त्याचे दोन वर्षे मेंटेनन्स त्या ठेकेदाराने करणे हे त्या टेंडर कॉपी मध्येच आहे. ठेकेदाराकडून हे काम करून घेतले जाईल.
नरेश पवार,
उपभियंता सार्वजनिक बांधकाम उरण







