वाकण-पाली-खोपोली मार्गाची दुरवस्था


198 कोटी रूपयांचा चुराडा; स्त्याला भेगा व खड्डे
| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
वाकण-पाली-खोपोली राज्य महामार्गाचे रुंदीकरण व काँक्रिटीकरणाचे काम 2016 पासून सुरू आहे. मागील सहा वर्षांपासून संथ गतीने सुरू असलेले काम, रस्त्यावरील खड्डे आणि निकृष्ट दर्जाचे काम अशा विविध समस्येच्या गर्तेत हा राज्यमहामार्ग सापडला आहे. त्यामुळे या रस्त्याच्या गुणवत्तेवर सवाल उपस्थित केले जात आहेत. परिणामी, 198 कोटी रूपयांचा चुराडा होताना दिसत आहे. रस्त्याच्या कामासाठी तब्बल तीन कंन्ट्रक्शन कंपन्या झाल्याने नव्याने बांधण्यात आलेला रस्त्याला अक्षरशः भेगा पडल्या आहेत. अर्धवट कामामुळे रस्ता ठिकठिकाणी खराब झाला आहे. अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. तयार रस्ता समतल नाही, मोर्‍या खचून त्याला भगदाड पडले आहे. तसेच जुन्या मोर्‍यांचे बांधकाम न तोडता त्यावर नवीन काम करण्यात आले आहे. याबरोबरच नव्याने तयार केलेल्या काँक्रीटच्या रस्त्याला पाणी न मारणे, तसेच ताबडतोब वाहने जाण्यास सुरुवात केली आहे. अवघड वाहतूक, आदी कारणांमुळे रस्त्यांचा दर्जा घसरत चालला आहे. सहा वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीत अवघे 39 कि.मी.चे हे कामपूर्ण झाले नाही. तर मग रस्त्यासाठी अजून किती वर्षे वाट पाहावी लागणार? असा सवाल सामान्य जनतेतून केला जात आहे.

वाकण-पाली-खोपोली हा राज्य महामार्ग क्र. 548 (अ) असून हा मार्ग एकूण 39 किलोमीटरचा लांबीचा आहे. रस्त्याची रूंदी 30 मीटर असून, यामध्ये काँक्रिटीकरण, साईटपट्टी, गटार रस्त्याच्या दुतर्फा झाडे अशा प्रकारचा रस्ता होणार आहे. वाकण ते पाली हा 9 कि.मी. रस्त्याचे डांबरीकरण होत आहे. आणि पाली ते पाली फाटा या 30 कि.मी. रस्त्याचे काँक्रीटीकरण होत आहे. महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाकडून या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सन 2016 पासून हाती घेण्यात आले आहे. मात्र, कामाची गती व दर्जा पाहता या रस्त्याचे काय होणार, हा प्रश्‍नच आहे.

नव्याने काँक्रिटीकरण करण्यात आलेला रस्ता हा तात्काळ वाहतुकीसाठी खुला करण्यात आल्यामुळे रस्त्यावर काही ठिकाणी खड्डे पडले आहेत. नियमानुसार 28 दिवसांनंतर सदर रस्ता हा वाहतुकीस खुला करण्यात येतो. असे न केल्यामुळे रस्त्यावर खडी निघालेली दिसत आहे व रस्त्याला भेगा पडलेल्या दिसतात. तो रस्ता तात्काळ पुन्हा दुरुस्त करण्यात येणार आहे. या महामार्गावरील सर्व मोर्‍यांचे ऑडिट करण्यात आले असून, ज्या मोरी चांगल्या स्थितीत आहेत अशा मोरीवर स्लॅप टाकण्याचे काम सुरू आहे आणि जे धोकादायक आहेत, ते तोडून नव्याने बांधण्यात आले आहेत. सचिन निफाडे, उपअभियंता, एमएसआरडीसी

Exit mobile version