महाराष्ट्रातील गरीब कुटुंबांची दिवाळीत होणार उपासमार

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
दिवाळी दोन दिवसांवर आली मात्र शासनाने जाहीर केलेले विशेष किट तर सोडाच राज्यात कुठेही नेहमीचे धान्यही नाही. रेशन कार्डधारकांना ओक्टोबर २०२२ ला दिवाळीनिमित्त धान्याऐवजी वस्तूंचे किट मुख्यमंत्री यांनी देण्याचे गेल्या महिन्यात जाहीर केले. मात्र आता ओक्टोबरची १९ तारीख उजाडली. लोक धान्य घेण्याकरीता रेशन दुकानदाराकडे लाईन लावत आहेत. मात्र जिल्ह्यातील कुठेही अन्न सुरक्षा कायद्यानुसार रेशन धान्य दुकानामध्ये पोचलेले नाही. तसेच शासनाने जाहीर केलेले किटही उपलब्ध झालेले नाही. यातून शासन उगाचच गोरगरीबांना आस दाखवून फसवणुक करत असल्याचे दिसुन येत आहे. ऐन दिवाळीच्या दिवसात लोकांपर्यंत धान्य पोचत नाही ही खेदाची बाब आहे.

PMGKY (प्रधान मंत्री गरीब कल्याण योजने)चे धान्यही रेशन दुकानामध्ये पोचलेले नाही. तर खरोखर गोरगरीब कष्टकरी आदिवासी दिवाळी कशाप्रकारे साजरी करणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे. श्रीमंत खातील तुपाशी गरीब राहतील उपाशी, असे होऊ नये यासाठी शासनाने तात्काळ काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच या निव्वळ घोषणा रहाणार नाहीत, अशी अपेक्षा अन्न अधिकार अभियानने व्यक्त केली आहे. यावेळी मुक्ता श्रीवास्तव, उल्का महाजन, चंद्रकांत यादव, दिलीप डाके, शब्बीर देशमुख आदी उपस्थित होते.

Exit mobile version