| मुंबई | प्रतिनिधी |
लोकप्रिय मराठी अभिनेत्री प्रिया मराठेचे 38 व्या वर्षी निधन झाले आहे. कर्करोगाशी तिची सुरू असलेली झुंज अपयशी ठरली. तिच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. मिरा रोडवरील राहत्या घरी तिने आज सकाळी चार वाजता अखेरचा श्वास घेतला.
श्रीकांत मोघे यांची सून आणि शंतनू मोघेची पत्नी असणारी प्रिया मराठीसह हिंदी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री होती. ती गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून कर्करोगाशी झुंज देत होती. अभिनेत्रीने आजवर अनेक मराठी-हिंदी मालिकांमध्ये काम करीत एक वेगळी ओळख निर्माण केली होती. ‘या सुखांनो या’ या मालिकेतून तिने टेलिव्हिजनवर पदार्पण केले. त्यानंतर ‘तू तिथं मी’, ‘चार दिवस सासूचे’, ‘ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण’, ‘येऊ कशी कशी मी नांदायला’, ‘तुझेच मी गीत गात आहे’ अशा मालिकांमध्ये तिने विविध धाटणीच्या भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन केले. पवित्र रिश्ता मालिकेतील तिची भूमिका विशेष गाजली. या मालिकेत तिने वर्षा ही भूमिका साकारली होती. त्याबरोबरच तिच्या चार दिवस सासूचे या मालिकेतील भूमिकेचे देखील मोठे कौतुक झाले होते. तसेच, तिने ‘बडे अच्छे लगते है’, ‘उतरन’, ‘कसम से’, ‘साथ निभाना साथिया’ या मालिकांमध्ये देखील काम केले होते. मराठी हिंदी मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून तिची ओळख होती.




