| अलिबाग | प्रतिनिधी |
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत सोमवारी (दि.14) वरसोली येथील ग्रामपंचायतीमधील सभागृहात चर्चा झाली. या चर्चेत कर्मचाऱ्यांनी विविध प्रश्नांबाबत आपले मत व्यक्त केले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी कर्मचाऱ्यांचे प्रश्न ऐकून घेऊन प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन दिले. ही सभा सकारात्मक चर्चेतून पार पडली असल्याची माहिती ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी दिली.
जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांच्या अध्यक्षतेखाली उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव, जिल्ह्यातील गटविकास अधिकारी तसेच ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेची जिल्हा कार्यकारिणी यांची सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हाध्यक्ष मंगेश म्हात्रे यांनी संघटनेकडून दिलेल्या निवेदनावर आपली रितसर बाजू मांडून कर्मचाऱ्यांवर होणारा अन्यायाबाबत माहिती दिली. वेगवेगळ्या प्रलंबित प्रश्नांबरोबरच तालुक्यातील कर्मचारी यांच्या थकीत किमान वेतन, रहाणीमान भत्ता, पी.एफ, अपूर्ण सेवा पुस्तक, आठवडा सुट्टी या सर्व तक्रारीचा पाढा वाचून दाखविला. गटविकास अधिकारी यांच्याकडे सर्व तक्रारीचा अहवाल तयार करण्यात यावा. गटविकास अधिकारी यांच्याकडे तो अहवाल पाठवून त्याची पुर्तता विनाविलंब करण्याची कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन भोसले यांनी दिले.







