। गोवे-कोलाड । वार्ताहर ।
संपूर्ण जगभरात रोहा तालुक्यातील धाटाव औद्योगिक क्षेत्राचे नाव आहे, मात्र याच औद्योगिक क्षेत्रातील मान्सूचे तसेच क्षेत्रातील सांडपाणी वाहून जाणार्या गटारांची कामे ईटेंडरिंगद्वारे ठेकेदाराने घेतली आहेत. मागील दीड दोन वर्षांपासून अंतर्गत पाईपलाईन आणि सदरच्या गटारांच्या कामांची खोदाई ठेकेदाराने करून पाईपलाईन व गटारांच्या कामांना सुरूवात केली. मात्र काही कामे अर्धवट अवस्थेत असल्याने भर पावसात आता येथे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.
रोहा धाटाव एमआयडीसी हद्दीतील नाल्यांच्या कामासाठी व पाईपलाईनसाठी खोदलेल्या रस्त्यांमुळे अपघातांचा धोका वाढला असून काही ठिकाणी चक्क ठेकेदाराने मलमपट्टी लावली आहे. गटार कामासाठी व पाईपलाईनसाठी काही ठिकाणी रस्ता खोदून त्या ठिकाणी पाईप गाडले, तर काही ठिकाणी मोर्या बांधण्यात आल्या. परंतु रस्ता खोदल्याने त्या दोन्ही बाजूस मोठं मोठे खड्डे झाले आहेत. त्यावर संबधित ठेकेदाराने केवळ खडी पसरवून ठेवली आहे. या खडीमुळे येथे ये-जा करण्यार्या कामगारांना तसेच नागरीकांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.