पोलादपुरात राजकीय स्थित्यंतराची शक्यता

राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी सुरु

| पोलादपूर | प्रतिनिधी |

राज्यातील राजकीय स्थित्यंतरानंतर अलिकडेच त्याचे राजकीय पडसाद पोलादपूर तालुक्यातही उमटत असून या सर्व कानगोष्टींमध्ये सक्रीय असलेल्या राजकीय पक्षांमध्ये शिवसेना, शिंदे गट, शेकापक्ष आणि काँग्रेस हे चार प्रमुख राजकीय पक्ष अग्रेसर असल्याचे दिसून येत आहेत.

पोलादपूर नगरपंचायतीच्या निवडणुकीवेळी तत्कालीन पालकमंत्र्यांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून केलेल्या कामांबद्दल स्थानिक आमदारांकडून शिवसेनेच्या मंत्र्यांनी काम आपल्या सांगण्यावरून मंजूर केल्याचे प्रतिदावे झाले. आता सद्यस्थितीत नगरपंचायत दुफळीच्या उंबरठयावर असण्याची शक्यता दोन वर्षांपूर्वीच्या शिवसेनांतर्गत नेतृत्व संघर्षाच्या पार्श्‍वभूमीवर निर्माण झाली असूनही यासंदर्भातील कानगोष्टींची उघड वाच्यता दोन्ही गटांकडून टाळली जाऊन काहीच झाले नसल्याच्या आविर्भावात ऑल इज वेल म्हटले जात आहे.

नगरपंचायतीच्या निवडणुकीनंतर पुन्हा बहुमत प्राप्त केलेल्या सत्ताधारी शिवसेना गटामध्येदेखील विभाजनाच्या कानगोष्टी सुरू असून आगामी पंचायत समिती आणि रायगड जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्येही शिवसेनेचे दोन गट आमनेसामने उभे ठाकण्याच्या तयारीमध्ये आहेत. तत्पूर्वी, तालुक्यातील भोगाव खुर्द, बोरघर, चांभारगणी बुद्रुक, दिविल, गोळेगणी, कालवली, कापडे खुर्द, कोतवाल बुद्रुक, कोतवाल खुर्द, लोहारे, ओंबळी, पैठण, पार्ले, परसुले आणि उमरठ या ग्रामपंचायतींची मुदत सप्टेंबर 2022 मध्ये संपुष्टात येत असून त्याआधीच वझरवाडी, तुर्भे बुद्रुक, तुर्भे खोंडा आणि तुर्भे खुर्द या चार ग्रामपंचायतींच्या निवडणुका संपल्याने जाहिर होण्याची शक्यता वर्तविली जात असल्याने शिवसेना विरोधात शिंदे गट अशा लढती होताना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेनेच्या अस्तित्वाच्या लढाईमध्ये ग्रामपंचायत निवडणुक स्तरावर महाविकास आघाडी म्हणून साथ देतील, अशी शक्यता कमी दिसून येत आहे.

पंचायत समिती चार गण आणि आणि रायगड जिल्हा परिषदेच्या दोन गटांमध्ये सद्यस्थितीत असलेल्या प्रशासकीय राजवट आणि आरक्षणाच्या पेचानंतर होऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये शिवसेना, शिंदे गट, शेतकरी कामगार पक्ष आणि काँग्रेस हे सक्रीय झाले असल्याचे दिसून येत आहे. मात्र, भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून या सर्व राजकीय वेगवान घडामोडींमध्ये वेट अ‍ॅण्ड वॉचची भूमिका घेत आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयातील निकाल आणि शिवसेना तसेच राज्यातील सरकारबाबतचा घटनापीठाचा निकाल याची प्रतिक्षा असल्याचे संकेत दिले आहेत. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या आगामी निवडणुकांसाठी सक्रीय झालेल्या काँग्रेस पक्षानेही स्व.माणिक जगताप यांच्या निधनानंतरच्या शक्यता पडताळून पाहण्याचा सावध पवित्रा घेतला आहे.

सद्यस्थितीत अस्तित्वाच्या लढाईसाठी संघर्षरत असलेल्या शिवसेनेतर्फे नवनियुक्त तालुकाप्रमुख अनिल मालुसरे हे नवनियुक्त जिल्हा संपर्कप्रमुख संजय मानाजी कदम यांच्यासोबत पोलादपूर तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागात गणेशदर्शन करीत जनसंपर्क साधत आहेत. राज्यातील सत्तासंघर्षाच्या न्यायालयीन निकालावर भुमिका अवलंबून असलेल्या शिवसेना कार्यकर्त्यांकडून या पदाधिकार्‍यांचे केवळ थंड स्वागत होत असल्याचे दिसून येत आहे. मात्र, पंचायत समिती व जिल्हा परिषदेचे आरक्षण आणि राज्यातील सत्तासंघर्षाचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर सध्या काठावरचे असलेले तळयात की मळयात अशी स्पष्ट भुमिका घेण्याची शक्यताही जाणवत आहे.

Exit mobile version