आरोग्य विभागाच्या रुग्णालयाना सूचना
| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
महाराष्ट्र शुश्रुषागृह नोंदणीची प्रभावी अंमलबजावणी न करणार्या हॉस्पिटल व शुश्रुषागृह यांना नोंदणी रद्द करण्याचा इशारा पनवेल पालिकेच्यावतीने देण्यात आला आहे. प्रहार जनशक्ती पक्षाने केलेल्या मागणीनंतर पालिकेच्या आरोग्य विभागकडून हा इशारा देण्यात आला असून, स्वतंत्र तक्रार निवारण कक्षाची स्थापना करून पालिकेने सर्वसामान्य जनतेसाठी टोल फ्री नंबर उपलब्ध करून द्यावा व महाराष्ट्र शुश्रुषागृह नोंदणी (सुधारित) नियम, 2021. ची प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणी प्रहार जनशक्ती पक्षाकडून करण्यात आली होती.
पनवेल महानगरपालिका हद्दीतील कार्यरत असणार्या अनेक खासगी हॉस्पिटल आणि नर्सिंग होम हे महाराष्ट्र शुश्रुषागृह नोंदणी (सुधारित) नियम, 2021. चे पालन करत नसल्याची तक्रार प्रहार जनशक्ती पक्षांकडून आयुक्त मंगेश चितळे व मुख्य वैद्यकीय अधिकारी आनंद गोसावी यांच्याकडे निवेदनद्वारे करण्यात आली होती व या कायद्याची अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात आली. स्वतंत्र तक्रार निवारण कक्षाची स्थापना करून पालिकेने सर्वसामान्य जनतेसाठी टोल फ्री नंबर उपलब्ध करून द्यावे, जेणेकरून रुग्णांना आपल्या तक्रारी दाखल करता येतील, अशी मागणी ही प्रहारचे जिल्हाध्यक्ष संतोष गवस यांनी केली होती. तसेच महानगरपालिका क्षेत्रातील खासगी हॉस्पिटल आणि नर्सिंग होम यांची तपासणी व चौकशी करून जे हॉस्पिटल या कायद्याचे उल्लंघन करत असतील अशा सर्व संबंधित हॉस्पिटल आणि नर्सिंग होम यांच्यावर प्रचलित कायद्यानुसार कडक कार्यवाही करण्यात यावी व यात दोषी असलेल्या हॉस्पिटलची नोंदणी रद्द करण्यात यावी असे न केल्यास प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने पालिका प्रशासनाविरोधात आंदोलन करण्यात येईल अशा इशारा दिला होता. या निवेदनाची दखल घेत पालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी आनंद गोसावी यांनी महाराष्ट्र शुश्रुषागृह नोंदणी (सुधारित) ची प्रभावी अंमलबजावणी न करणार्या हॉस्पिटल व शुश्रुषागृह यांना नोंदणी रद्द करण्याचा परीपत्रक काढून कायदेशीर कडक कारवाई करण्याचा पालिकेने इशारा दिला असल्याचे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.