| नागोठणे | प्रतिनिधी |
नागोठणे टपाल कार्यालय ज्या इमारतीतून गेली अनेक वर्षे आपला कारभार चालवीत आली आहे ती जुनी इमारत सध्या धोकादायक अवस्थेत आहे. ही इमारत वापरण्यायोग्य नसल्याचा स्ट्रक्चरल ऑडीट अहवाल अलिबाग येथील असोसिएटेड कन्सल्टिंग इंजिनिअर्स यांच्याकडून या इमारतीची प्रत्यक्ष पाहणी करून 13 मार्च, 2023 मध्येच देण्यात आल्याने या इमारतीमधील टपाल कार्यालयात विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांच्या व खातेधारकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे या इमारतीत सुरू असलेले टपाल कार्यालय तत्काळ इतरत्र हलवावे असा पत्रव्यवहार स्ट्रक्चरल ऑडीट अहवाल प्राप्त झाल्यानंतर टपाल कार्यालय व संबंधितांकडे केला असल्याचे नागोठणे ग्रामपंचायतीच्या सरपंच सुप्रिया महाडिक यांनी सांगितले.
नागोठणे ग्रामपंचायतीच्या स्व. बाळासाहेब ग्रामसचिवालयालगत ही एक मजली इमारत आहे. सिटी सर्व्हे न. 738 मधील नागोठणे ग्रामपंचायत दफ्तरी घर नं. 288 असलेल्या या इमारतीचे बांधकाम जुन्या पद्धतीचे असून लाकडांचा जास्त वापर केलेली ही इमारत कौलारू आहे. या इमारतीचे बांधकामाला 75 वर्षांहून अधिक काळ उलटून गेल्याने ही इमारत जीर्ण झाली असून वापरण्यायोग्य नसल्याचे स्ट्रक्चरल ऑडीट अहवालावरून स्पष्ट होत आहे.
नागोठणे टपाल कार्यालय असलेली इमारत अत्यंत जुनी असून ती पावसाळ्यात, वादळवाऱ्यात किंवा अतिवृष्टीमुळे केव्हाही पडेल आणि मनुष्यहानी होईल अशी शक्यता असल्याने या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडीट करून त्याचा अहवाल सादर करावा असे नागोठणे ग्रामपंचायत कार्यालयातून या धोकादायक इमारतीचे मालमत्ता पत्रकावर असलेले सर्व मालक तसेच नागोठणे टपाल कार्यालयाचे पोस्ट मास्तर यांच्याकडे सन 2021 पासून वेळोवेळी पत्रव्यवहार करण्यात आला होता. त्यानुसारच या धोकादायक इमारतीची साधारण अडीच वर्षांपूर्वी अलिबाग येथील असोसिएटेड कन्सल्टिंग इंजिनिअर्स यांच्याकडून संबधित इमारतीच्या जागी प्रत्यक्ष भेट देवून प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर ही इमारत वापरण्यायोग्य नसल्याचा अहवाल 13 मार्च, 2023 रोजी देण्यात आलेला आहे. असे असूनही पोस्ट कार्यालयाचे अधिकारी नवीन जागा शोधण्यासाठी टाळाटाळ करीत असल्याने नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असून याबाबत टपाल खात्यातील कुणाचे आर्थिक साटेलोटे तर आड येत नाहीत ना अशी उलटसुलट चर्चा होत आहे.
नागोठणे टपाल कार्यालयासाठी नवीन जागेचा तातडीने शोध घेऊन स्थलांतर करावे अशा प्रकारचा पत्रव्यवहार वेळोवेळी नागोठणे सहाय्यक पोस्ट मास्तर यांचेकडे केलेला आहे. त्यानुसार गेली 4-5 महिन्यांपासून नवीन जागेचा शोध सुरू आहे. दोन जागांची पाहणीही करण्यात आली होती मात्र व्हेंटिलेशनचा अभाव व इतर तांत्रिक कारणांनी त्या जागा रद्द करण्यात आल्या. मात्र असे असले तरी लवकरात लवकर जागेचा शोध घेऊन नागोठणे टपाल कार्यालय स्थलांतरित करण्याच्या सूचना नागोठण्याचे सहाय्यक पोस्ट मास्तर सूरज रुईकर यांना देण्यात आल्या आहेत.
सुनील थळकर,
जिल्हा टपाल मुख्यालयाचे अधीक्षक






