डाक विभागाचे जनसंपर्क अभियान सुरू

। सारळ । वार्ताहर ।
रायगड डाक विभागाने कोव्हिड निर्देशाचे पालन करत ग्रामीण भागातील ग्रामस्थांपर्यंत बचत व विम्याच्या संदर्भातील सरकारी योजना पोचवण्यासाठी विशेष अभियान चालू केले आहे. पारंपारिक पद्धतीने कामकाज करणारा डाक विभाग आता बदल करत या अभियानातून थेट ग्राहकांशी संपर्क साधून त्यांना या योजनांची माहिती देण्याबरोबर त्यांच्या योजेनेसंबधी असणार्‍या शंकाचेही निरसन करणार आहे. या अभियानाचा एक भाग म्हणून रायगड डाक विभागातर्फे 15 ते 25 सप्टेंबर या कालावधीत सुकन्या समृद्धी मोहीम साजरी केली जाणार आहे. यानिमिताने जास्तीत जास्त मुलींची खाती उघडली जाणार आहेत. या कालावधीत 10 वर्षाखालील प्रत्येक मुलीचा या योजनेचा फॉर्म भरला जाईल यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. तसेच 21 सप्टेंबर या दिवशी डाक जीवन विमा व 22 सप्टेंबर ग्रामीण डाकजीवन विमा महालॉगिन दिवस साजरा केला जाणार आहे. या अभियाना निमित्त खेडेगावामधील शाखा डाक कार्यालयामार्फत गावातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत या समाज उपयोगी योजना पोहचवण्यासाठी अविनाश पाखरे रायगड डाक अधीक्षक यांनी सर्व कर्मचारीवर्गाशी संवाद साधून ऑनलाईन मार्गदर्शन केले.

Exit mobile version