डाक विभागाच्या योजना पोहोचविणारे दूत; रामचंद्र जायभाये यांचे प्रतिपादन
| सारळ | प्रतिनिधी |
ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत शासनाच्या विविध योजना आणि टपाल विभागाच्या सेवा पोहोचविण्यात ग्रामीण डाक सेवकांची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. ग्रामीण डाक सेवक हे केवळ टपाल पोहोचविणारे कर्मचारी नसून, शासनाच्या कल्याणकारी योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविणारे खरे दूत आणि टपाल विभागाचे सैनिक आहेत, असे प्रतिपादन महाराष्ट्र सर्कलचे मुख्य पोस्टमास्टर जनरल श्री. रामचंद्र किसन जायभाये यांनी केले.
रायगड डाक विभागाच्या भेटीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक परिसरात ग्रामीण डाक सेवकांचे विशेष संमेलन आयोजित करण्यात आला होता. या संमेलनाला रायगड विभागातील ग्रामीण भागांतून मोठ्या संख्येने ग्रामीण डाक सेवक उपस्थित होते. यावेळी मुख्य पोस्टमास्टर जनरल जायभाये यांनी ग्रामीण डाक सेवकांशी संवाद साधत त्यांच्या कार्याचे महत्त्व अधोरेखित केले. तुम्ही शासनाच्या योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविणारे डाक सैनिक आहात. डाक विभागाच्या योजना सर्वसामान्य कुटुंबांचे आर्थिक भविष्य उज्ज्वल करू शकतात. एखाद्या कुटुंबाला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्याची ताकद तुमच्या कामात आहे. ग्रामीण भागात आर्थिक क्रांती घडवून आणण्याची क्षमता तुमच्यात आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपले काम केवळ नोकरी म्हणून न पाहता सामाजिक बांधिलकी म्हणून करावे. टपाल विभागाच्या विविध योजना, बचत योजना आणि आर्थिक सेवा या ग्रामीण जनतेच्या आर्थिक उन्नतीसाठी महत्त्वपूर्ण ठरत आहेत. या योजनांचा लाभ अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रत्येक डाक कर्मचाऱ्याने समर्पणाने काम करावे, असे आवाहन त्यांनी केले. ग्रामीण भागातील नागरिकांचा विश्वास संपादन करून टपाल विभागाची प्रतिमा अधिक उंचावण्याचे काम ग्रामीण डाक सेवकांनी करावे, असेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमात रायगड विभागाचे अधीक्षक डाकघर राजेश रनाळकर यांनी ग्रामीण डाक सेवकांना सादरीकरणाच्या माध्यमातून टपाल विभागाच्या विविध योजना, त्यांची अंमलबजावणी, कामकाजातील संधी आणि उद्दिष्टपूर्ती याविषयी सविस्तर माहिती दिली. या कार्यक्रमाला डाक निरीक्षक, महाड श्री. संतोष मोरे तसेच डाक निरीक्षक, माणगाव गोविंद कदम उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौंदर्याचे अनेक अवॉर्ड मिळवलेल्या भारती चोरट यांनी केले. यावेळी संभाजी शेळके, कृष्णा खंदारे, साशंक पाटील, ऋषिकेश सोनी, दीपिका शेडगे, शंकर गाडे, सिद्धेश्वर मुंडे, सचिन क्षीरसागर, कृष्णा नीलकंठ, संकेत बनकर, अदिती पाटील, महेंद्र पाटील, विजय मुजुमले गौरी गिरे, रामचंद्र शेडगे, नामदेव पोटले, अतुल गाडगे, अभय राठोड या ग्रामीण डाक सेवकांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.
