काही तासातच रस्त्यावरील खडी उखडली
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
अलिबाग – सुडकोली मार्गावरील पडलेल्या खड्डयांची डागडुजी करण्यात आली. मात्र, काही तासातच रस्त्यावरील खडी उखडून निघाली आहे. त्यामुळे रस्ता दुरुस्तीचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप होत आहे. संबंधितांविरोधात कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे.
अलिबाग ते माणगावमधील साई पर्यंतचा रस्ता 84 किलो मीटरचा रस्ता हॅम योजने अंतर्गत मंजूर झाला. बांधा वापरा आणि हस्तांतरण करा या धर्तीवर रस्त्याचे काम करण्यात आले. वेळवली, खानाव पर्यंत काँक्रीटीकरण करण्यात आले. हॅममधून मंजूर होऊन अपूर्णावस्थेत असणारा अलिबाग -रोहा रस्ता आता खड्ड्यांमुळे जाम झाला आहे. खानाव ते सुडकोली हा प्रवास अपघाताला निमंत्रण देणारा ठरत आहे. खास करून नांगरवाडी ते भागवाडी मधील खिंडीची अवस्था दयनीय झाली आहे. अपघात होण्याची भिती निर्माण झाली आहे. अलिबागपासून रोहा साईपर्यंत 84 किलो मीटरच्या रस्त्यासाठी 177 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या रस्त्याचे 50 टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा बांधकाम विभागाने केला आहे. परंतु, अलिबाग- रोहा मार्गावरील सुडकोली पासून अलिबागपर्यंतच्या रस्त्याची अवस्था बिकट झाली आहे. कोट्यावधी रुपये खर्च करून रस्ता खड्डेमय आहे. आता धुळीचे कण नाका तोंडात जात आहे.
मंगळवारपासून खड्डे बुजविण्याचे काम कंपनीमार्फत करण्यात आले. मात्र, काही तासातच रस्त्यावरील खडी पुन्हा उखडली आहे. त्यामुळे या खडीतून मार्ग काढताना चालकांना प्रचंड त्रास होत आहे. खड्डे बूजविण्यासाठी करण्यात आलेला खर्च मातीमोल झाल्याचे दिसून आले आहे. निकृष्ट दर्जाच्या या कामामुळे प्रवासी वर्गात तीव्र संताप निर्माण झाला आहे. या मार्गावरील खड्ड्यांचा प्रश्न कधी सुटणार असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
खड्डे बुजविण्याचे काम जेएआर कंपनीला देण्यात आले आहे. दुरुस्तीचे काम योग्य नसल्यास संबंधितांविरोधात योग्य ती कारवाई केली जाईल. त्यांना पुन्हा खड्डे बुजविण्यास सांगितले जाईल. काम योग्य पध्दतीने करणे गरजेचे आहे.
-मोनिका धायतडक,
कार्यकारी अभियंता
सार्वजनिक बांधकाम विभाग







