| रसायनी | प्रतिनिधी |
आजीवली हायस्कूल ते भाताण रस्त्याची अवस्था रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते अशी झाली आहे. यासाठी विभागातील राजकीय नेत्यांनी अहोरात्र मेहनत घेत, हा रस्ता स्थानिक आमदार निधीतून मंजूर करण्यात आला. रस्त्याचे काम आर बी देशमुख या कंपनीला देण्यात आले होते. आजीवली हायस्कूल ते भाताणपर्यंतचा रस्ता मंजूर झाला असताना कुठे माशी शिंकली आणि भाताण ते अष्टे गावापर्यंतच फक्त रस्ता करण्यात आला. मात्र, रस्ता अपूर्णच राहिला. नक्की या अपूर्ण राहिलेल्या कामाच्या टप्प्याला कोणते ग्रहण लागले, हा गुलदस्त्यातला विषय असून, हे कोडं मात्र काही सुटत नाही. पण भाताण ते आष्ट्यापर्यंतचा जो रस्ता करण्यात आलेला आहे. त्या रस्त्याची मात्र पहिल्याच पावसात पोलखोल झालेली पाहायला मिळाली. रस्ता तयार होऊन एक महिनादेखील झाला नसेल, मे महिन्यात सुरुवातीच्या झालेल्या पहिल्या पावसात हे खड्ड्यांचे दर्शन पाहायला मिळत आहे. सर्वसामान्य जनतेच्या पैशातून कोट्यवधींचा खर्च या रस्त्यासाठी करण्यात आला असून, पहिल्याच पावसात मात्र खड्डे पाहायला मिळतात.
या रस्ते कामासह बांधकाम विभागाचा प्रताप चव्हाट्यावर आला आहे. एकाच पावसाने रस्त्यांची अवस्था दयनीय झाल्याने रस्त्याच्या कामांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी दबलेले रस्ते, रस्त्यावरील वाहून गेलेले डांबरीकरणाचे अवषेश, पडलेले खड्डे पहिल्यावर नेमके बांधकाम विभागाचे अधिकारी करतात तरी काय, असा प्रश्न पडला आहे.
तरी बांधकाम विभागाने लोकांच्या जीवाशी खेळ न खेळता रस्त्याच्या कामाचा दर्जा योग्य राहील याची काळजी घ्यावी, अशी मागणी माजी पंचायत समिती उपसभापती वसंत काठावले यांनी केली आहे. यावर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने या रस्त्याची रीतसर माहितीही घेतली जाईल, असे सुनील पाटील यांनी सांगितले.