अपूर्ण कामामुळे अपघातांचा धोका वाढला
| खोपोली | प्रतिनिधी |
हाळ फाटा मार्गे पळसदरी-कर्जत या रस्ता क्रमांक 548/एची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून, रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना धोकादायक परिस्थितीतून मार्गक्रमण करावे लागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असलेल्या या रस्त्याचे काम अपूर्ण अवस्थेत असल्याने अपघातांचा धोका वाढला आहे. गेल्या काही दिवसांपासून अपघातांच्या घटना घडत असून, दोन दिवसांपूर्वी झालेल्या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला.
रस्त्यावरील खड्डे, अपूर्ण काम आणि अपुऱ्या सुरक्षाव्यवस्थेमुळे वाहनचालकांची मोठी गैरसोय होत आहे. या अपघातांत काहींना जीव गमवला असून, अनेक जण जखमी झाले आहेत. त्यामुळे रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे. रस्त्याचे काम सुरू असताना वाहनचालकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक सूचना फलक, प्रतिबंधक व्यवस्था आणि इतर सुरक्षात्मक उपाययोजना करणे अपेक्षित असताना त्याचा अभाव असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. रात्रीच्या वेळी या मार्गावरून प्रवास करणे अधिक धोकादायक ठरत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने रस्त्याची पाहणी करून अपूर्ण काम पूर्ण करून अपघातप्रवण ठिकाणी आवश्यक सुरक्षाव्यवस्था करावी, अशी मागणी होत आहे.
अपूर्ण कामामुळे या रस्त्यावर वारंवार अपघात होत आहेत. अनेक जण मृत्यूमुखी पडले असून, अनेक जण जखमी झाले आहेत. प्रशासनाने नागरिकांच्या जीविताचा प्रश्न गांभीर्याने घेऊन रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करावे आणि आवश्यक सुरक्षाव्यवस्था करावी.
किरण हडप,
माजी ग्रामपंचायत सदस्य
