कोप्रोली-खोपटा पूल रस्त्याला खड्ड्यांचे विघ्न

अवजड वाहतुकीमुळे नागरिक आले मेटाकुटीला

। उरण । प्रतिनिधी ।

कोप्रोली-खोपटा पूल रस्त्यावर खड्ड्यांचे विघ्न पाहायला मिळतं आहे. यामुळे कित्येक दुचाकीस्वारांचे या रस्त्यावर अपघात होत आहेत. विशेषतः रात्रीच्या वेळी रस्त्याचा अंदाज येत नसल्याने ही अडचण निर्माण होत आहे. विशेष म्हणजे साईट पट्ट्याच्या बाजूला तसेच गतिरोधक कळण्यासाठी जो रेडीयमयुक्त सफेद रंग द्यावा लागतो तोही देण्यात आलेला नाही. ही परिस्थिती कोप्रोली-खोपटापूल रोडवर नाही तर संपूर्ण उरण पूर्व विभागात पाहायला मिळत आहे एकीकडे खराब रस्ता तर दुसरीकडे रस्त्याच्या दोन्ही बाजूला उभे असलेले कंटेनर ट्रेलर यामुळे नागरिक मेटाकुटीला आले असून, या रस्त्यावर छोटे-मोठे अपघात नागरिकांच्या पाचवीला पुजले आहेत.

हा रस्ता सर्वसामान्य नागरिकांसाठी मृत्यूचा सापळा बनला आहे. विशेष म्हणजे पावसाळ्या पूर्वी या रस्त्यावर खडी टाकण्यात आली होती. ती खडी पावसामुळे व अवजड वाहतुकीमुळे वाहून गेलेली पाहायला मिळतं आहे.

रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे खोपटा-कोप्रोली रस्त्याची दुरवस्था झालेली पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे मोठ्या प्रमाणात होणारी जडवाहतूक, व रस्त्याच्या दोन्ही बाजूला उभे असलेले कंटेनर यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी नेमकं नक्की कुठून आणि कसं जायचं हाच प्रश्‍न सतावत आहे. अनेक दुचाकीस्वार पडणे अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे गंभीर दुखापत होऊन दुचाकीस्वारांच्या जीवाला धोका निर्माण होत आहे. त्यामुळे लवकरात लवकर या प्रश्‍नांकडे लक्ष द्यावे अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत. उरण पूर्व विभागातील खोपटा पूल हा कोप्रोली, पिरकोन, आवरे, गोवठणे, वशेणी, पाले, मोठी जुई, कळंबुसरे, चिरनेर, पेण, अलिबाग तालुक्यातील गावांना उरण पश्‍चिम विभाग, उरण शहर, पनवेल, नवी मुंबई व मुंबईशी जोडणारा अविभाज्य घटक आहे.

एवढा महत्वाचा मार्ग असणार्‍या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. कोप्रोली- खोपटापूल रस्त्यासाठी निधी मंजूर केला होता. 3 कोटी 75 लाखांच्या निधीतून नेमलेल्या ठेकेदारांनी रस्त्याचे डांबरीकरण व काम अंत्यत निकृष्ट दर्जाचे केले होते. रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रस्त्याच्या दुरवस्थेवर प्रवासी नाराजी व्यक्त करीत आहेत. या रस्त्यावर अपघात वाढत असून जीव गमवावा लागेल, अशी भीती प्रवासी व्यक्त करीत आहेत. विशेषतः रात्रीच्या वेळी प्रवाशांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. पूर्वी संबधित रस्त्यांचे काम एनएचएआयला हस्तांतरित करण्यात आले होते व त्यांच्या माध्यमातून रस्त्याचे काम करण्यात आले होते.

खोपटा-कोप्रोली रोडचे काम पुन्हा सार्वजनिक बांधकाम विभागाला हस्तांतरित झाले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून या रस्त्यावरील खड्डे बुजवले होते, मात्र ही खडी निघून गेल्यानंतर रस्त्याची स्थिती पुन्हा खड्डेमय झाली आहे. पावसाळ्यात रस्त्याची कामे घेता येत नाहीत ती पावसाळा संपल्यावर करण्यात येईल, असे बांधकाम विभागाच्या माध्यमातून सांगण्यात आले होते.

खोपटा-कोप्रोली मार्ग पूर्व विभाग पेण, अलिबाग, मुंबई, नवी मुंबई व पनवेलशी जोडणारा दुवा आहे. त्यामुळे नेहमी प्रवास करतो, मात्र या रस्त्याची दुरवस्था झाली आहे व खड्ड्यांचे विघ्न या रस्त्यावर पाहायला मिळत आहे. यामुळे कित्येक दुचाकीस्वार या रस्त्यावर पडत आहेत. विशेषत: रात्रीच्या वेळी रस्त्याचा अंदाज येत नसल्याने ही अडचण निर्माण होत आहे.

– केशव म्हात्रे,
खोपटे, द.पी.पाडा

Exit mobile version