| नेरळ | प्रतिनिधी |
नेरळमधील तळवडे येथे असलेल्या उल्हास नदी पुलावरील रस्ता अत्यंत खराब झाला आहे. या पुलावरील डांबरीकरण खराब झाल्याने दुचाकीस्वारांना रात्रीच्या वेळी प्रवास करणे धोकादायक बनले आहे. दरम्यान, हा रस्ता नव्याने करण्याआधी जेसीबीच्या साहाय्याने जुना रस्ता उखडून काढण्यात यावा, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ आत्माराम घोडविंदे यांनी केली आहे.
उल्हास नदीवर कोल्हारे वाडी आणि तळवडे यांना जोडणारा पूल काही वर्षांपूर्वी सार्वजनिक बांधकाम खात्याने बांधला होता. या पुलामुळे या भागातील जनजीवन अधिक सुरळीत झाले. त्यानंतर या पुलासह परिसरातील मार्गांवर सार्वजनिक बांधकाम खात्याने अनेकदा करोडो रुपयांचा निधी खर्च केला आहे. मात्र, या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने हा रस्ता खड्ड्यात गेला आहे. या ठिकाणी साधारण अर्धा ते एक फुटाचे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यातून वाट काढणे वाहनचालक यांना धोक्याचे बनले आहे. त्यामुळे कर्जत सार्वजनिक बांधकाम विभागाने तळवडे पुलाच्या पृष्ठभागावर निर्माण झालेले खड्डे सपाट करून नंतर नव्याने दुरूस्ती करावे, अशी स्थानिक मागणी आत्माराम घोडविंदे यांनी केली आहे.
नेरळमधील तळवडे पूल खड्ड्यात
