। पाली । वार्ताहर ।
एक ते दीड वर्षांपूर्वी नूतनीकरण झालेल्या वाकण-पाली राज्य महामार्गावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे डांबरीकरणाच्या कामावर प्रश्न निर्माण झाले आहेत.
खड्ड्यांमुळे अपघाताचे प्रमाणही वाढल्याने चालक त्रस्त आहेत. वाकण-पाली-खोपोली राज्य महामार्ग काही वर्षांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून एमएसआरडीसीकडे वर्ग करण्यात आला आहे. त्यानंतर महामार्गाचे रुंदीकरण करण्यात आले. ठेकेदारामार्फत पाली फाटा ते पालीपर्यंतचा रस्ता सिमेंट काँक्रिटचा करण्यात आला आहे.
पाली ते वाकण फाटापर्यंत 9 किलोमीटर रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले आहे. हे काम गतवर्षीच पूर्ण झाले असून पावसाळ्यानंतर रस्त्यावर ठिकठिकाणी जीवघेणे खड्डे पडले आहेत. यात वाहने आदळत असल्याने चालकांना मानदुखी, पाठदुखीचे आजार बळावले आहेत. शिवाय तोल जाऊन दुचाकी घसरण्याचे प्रकारही वाढले आहेत. वाकण नाका, वजरोली गावाच्या कमानीसमोर तसेच पालीकडे जाताना वळणावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. बलाप गावतील वळणावरही पडलेल्या खड्ड्यातील खडी रस्त्यावर पसरली आहे. यावरून दुचाकी घसरून अपघात होत आहेत. अंबा नदी पुलाच्या दोन्ही बाजूला खड्डे पडले आहेत.
अपघातात वाढ
वाकण-पाली खोपोली महामार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्याने या रस्त्यावर अपघाताचे प्रमाणदेखील वाढले आहे. खड्ड्यांमुळे त्याच्यात आणखी भर पडली आहे. तरी एमएसआरडीसीने या रस्त्यावरील खड्डे सुस्थितीत करावे, अशी मागणी प्रवासी वर्गासह वाहनचालकांकडून करण्यात येत आहे.