| दिघी । वार्ताहर ।
श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन गावातील प्रा. आरोग्य केंद्रात जाणार्या पाचशे मीटर मार्गावरील रस्त्याची अवस्था बिकट होत चालली आहे. येथील खड्ड्यांनीच रुग्णांचे जीव आता धोक्यात आले आहेत. गेली कित्येक वर्षे रखडलेल्या रस्त्याला मंजुरी मिळून सुध्दा काम थांबले आहे.
शहराच्या बसस्थानकाजवळून जाणारा रुग्णालयाचा रस्ता हा जिल्हा परिषद च्या अखत्यारीत असून, सद्या मोठमोठ्या कपर, दगडांनी व्यापला आहे. त्यामुळे जोखीमेतील प्रसूती, अपघात किंवा इतर सर्व गंभीर संवर्गातील रुग्णांना वाहनांनी किंवा चालत येणं मोठे जिकरीचे ठरत आहे. वेळीच उपचार सुरू करण्याकरिता प्रत्येक मिनिट महत्त्वाचा आहे. रुग्ण वेळीच रुग्णालयात पोहोचणे, विविध वैद्यकीय तपासणी करून त्यांच्यावर उपचार करणे रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अवघड बनले आहे. यासाठी रुग्णालय परिसरातील रस्ते चांगले असायला हवे अशी मागणी होत आहे. परंतु बोर्ली पंचतन परिसरातील दवाखान्यात जाणारा रस्ता खड्डयांनी माखला आहे. हा प्रकार अत्यवस्थ रुग्णांच्या जीवावर बेतणारा ठरू शकतो.
दवाखान्या शेजारी शैक्षणिक संस्था आहेत. शाळा, महाविद्यालयात याच मार्गाने जावे लागते. त्यामुळे विद्यार्थ्यांना घेऊन जाणार्या वाहनांसोबत पायी चालत जाणार्या बच्चेकंपनी चा रस्त्यांवर जागोजागी खड्डे असल्याने प्रवासही धोकादायक झाला आहे. काही किरकोळ अपघात घटना नेहमीचं झाल आहे. मात्र, त्याची नोंद झाली नसल्याने प्रशासनाचे याकडे लक्ष देत नाही. या रस्त्यावर मोठी दुर्घटना होण्याची सद्या भीती वाढत आहे. त्यामुळे रस्त्याची दुरुस्ती ची मागणी या भागातील नागरिक करत आहेत.
बोर्लीपंचतन रुग्णालय रस्त्याला मागील मार्च महिन्यात मंजुरी मिळाली होती. जिल्हा परिषद 2515 योजनेअंतर्गत मंजुरी मिळालेल्या या कामाला स्थगिती मिळाली आहे. – प्रवीण मोरे, उपअभियंता, जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग श्रीवर्धन