पुण्यात महाविकास आघाडीचे आज शक्तिप्रदर्शन

तीन उमेदवार अर्ज भरणार; जाहीर सभा

| पुणे | प्रतिनिधी |

महाविकास आघाडीच्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार सुप्रिया सुळे, शिरूरचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे आणि पुण्यातील उमेदवार रवींद्र धंगेकर गुरुवारी (18 एप्रिल) उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यानिमित्ताने महाविकास आघाडीच्या वतीने शक्तिप्रदर्शन करण्यात येणार असून शरद पवार यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी सभा होणार आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी साडेदहा वाजता हे तिघे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यानंतर रास्ता पेठ येथील हॉटेल शांताईसमोर महाविकास आघाडीची सभा होणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली. या सभेच्या निमित्ताने ज्येष्ठ नेते शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, आम आदमी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अजित फाटके सभेला मार्गदर्शन करणार आहेत. महाविकास आघाडी लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकणार आहे. विशेष म्हणजे बारामतीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुनेत्रा पवार गुरुवारीच उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

पुणे आणि शिरूर लोकसभेसाठी येत्या 13 मे रोजी तर बारामतीसाठी 7 मे ला मतदान होणार आहे. महाविकास आघाडीकडून या तिन्ही लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांकडून प्रचार सुरू झाला आहे. वैयक्तिक भेटीगाठी, नागरिकांबरोबर संवाद, पदयात्रांनी मतदारसंघातील वातावरण ढवळून निघण्यास सुरूवात झाली आहे. त्यातच आता नेत्यांच्या सभांमुळे वातावरण तापणार असून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी उडण्यास सुरुवात होणार आहे. शरद पवार, संजय राऊत या सभेच्या निमित्ताने काय बोलणार, याबाबतही महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. दरम्यान, प्रचाराचे रणशिंग फुंकल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर सभा घेण्याचे नियोजनही महाविकास आघाडीकडून करण्यात आल्याचे काँग्रेसचे निवडणूक प्रचार प्रमुख मोहन जोशी यांनी सांगितले.

Exit mobile version