ऐन उन्हाळ्यात वीज ग्राहकांना सोसावे लागताहेत उष्म्याचे चटके
| श्रीवर्धन | वार्ताहर |
मागील तीन-चार दिवसांपासून श्रीवर्धन शहरासह तालुक्यामध्ये विजेचा लपंडाव चालू आहे. वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर पूर्ववत होण्यास कमीत कमी अर्धा ते पाऊण तासाचा वेळ लागत आहे. शनिवारी व रविवारी श्रीवर्धनमध्ये पर्यटकांची खूप मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. याच वेळेला, म्हणजे शनिवारपासून श्रीवर्धन शहरासह तालुक्यामध्ये वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
श्रीवर्धन येथील मोजक्याच हॉटेलमध्ये जनरेटरची सुविधा उपलब्ध आहे. अन्य ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर वातानुकूलित यंत्रणादेखील बंद पडतात. त्यामुळे येणार्या पर्यटकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येते. पंखे जरी इन्वर्टरवर फिरत असले तरी वारंवार वीजपुरवठा खंडित होण्यामुळे इन्वर्टरच्या बॅटर्यादेखील डाऊन होतात. तालुक्यातील श्रीवर्धन शहर, दिवेआगर व हरिहरेश्वर या ठिकाणी पर्यटकांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात असते.
पावसाळ्यातदेखील वीजपुरवठा खंडित होण्याचा प्रकार वारंवार घडत असतो, त्यामुळे या ठिकाणी भूमीगत विद्युत वाहिन्या टाकण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत आहे. श्रीवर्धन शहरातसुद्धा भूमीगत विद्युत वाहिन्या टाकलेल्या आहेत. परंतु, त्याचा वापर अद्याप झालेला नाही. तरी महावितरणने भूमीगत विद्युत वाहिन्या लवकरात लवकर कार्यान्वित कराव्या, अशी मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे.