म्हसळामधील वीज समस्या संपुष्टात

नगरसेविका राखी करंबे यांचे प्रयत्न

| म्हसळा | वार्ताहर |

म्हसळा नगरपंचायतमधील नगरसेविका राखी अजय करंबे यांनी वार्ड मधील मागील तीन वर्षांपासून प्रलंबित असलेली नागरिकांची समस्या अवघ्या आठ दिवसांत सोडविली. वार्ड क्रमांक 13 मधील साळीवाडा परिसरातील प्रदीप कदम यांचे घरापासून ते रंजित जैन यांचे घरापर्यंत अनेक रहिवाशांचे घरात सातत्याने विजेची समस्या निर्माण होत होती. नागरिकांचे घरातील लाईट डीम होत होती, अनेक वेळा मधे मधे स्पार्क होणे, व्होल्टेज कमी होणे, टीव्ही, फ्रीज, एसी मशीन, कुलर, मिक्सर, वाशिंग मशीन, बोअरवेल मशीन, व अन्य इलेक्ट्रॉनिक वस्तू खराब होऊन नादुरुस्त झाल्याने नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला आहे. साळीवाडा परिसरातील ही समस्या सोडवण्यासाठी मागील 3 वर्षांपासून अशोक जैन, रंजित जैन, अश्रफ अली घराडे, निलोफर घराडे, मिनाक्षी जैन, नुतन जैन, सुरेश जैन, बाबूशेठ जैन, तेजपाल जैन, वासंती जैन, संगीता जैन, पुजा जैन, विक्रम सिंग, भवर कुंभार या नागरिकांनी म्हसळा नगरपंचायत व म्हसळा विजवीतरण कार्यालयात अनेक वेळा फेऱ्या मारून लेखी निवेदन दिले होते. परंत नागरिकांच्या लेखी पत्राला केराची टोपली दाखवली जात होती. परिसरातील नागरिक हैराण झाले होते शेवटी त्यांनी स्थानिक नगरसेविका राखी करंबे यांचेकडे ही समस्या मांडली आणि यावर उपाययोजना करण्याची मागणी केली. नागरिकांची समस्या लक्षात घेऊन नगरसेविका करंबे यांनी म्हसळा विजवीतरण विभागाचे उपअभियंता प्रदीप पटवारी यांचेकडे या समस्येवर तोडगा काढण्यासाठी चर्चा करून अवघ्या आठ दिवसांत ही समस्या सोडविली आहे.

नगरसेविका राखी करंबे यांनी साळीवाडा येथे स्वतः उपस्थित राहून हे काम पूर्ण करून घेतले. उपअभियंता पटवारी यांनी गोरेगाव येथील 13 विद्युत कर्मचारी यांचे सहकार्याने साळीवाडा परिसरातील सिंगल फेज विद्युत लाईन बदलून टू फेज विद्युत लाईन टाकून दिली आहे.

Exit mobile version