नागोठणे आठ तास अंधारात

। नागोठणे । वार्ताहर ।

सर्वत्र सध्या ऑक्टोबर हिटचा तडाखा सहन करावा लागत आहे. अशातच काही ठिकाणी परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. आता हा पावसाचा जोर वाढणार की ओसरणार, हा प्रश्‍न अनेकांना पडलेला असतानाच नागोठणेसह संपूर्ण रोहा तालुक्यात शनिवारी (दि.12) दुपारनंतर जोरदार वार्‍यासह विजेच्या कडकडाटासह आलेल्या मुसळधार पावसाने नागोठणे शहर व विभागासह संपूर्ण रोहा तालुक्याला अक्षरशः झोडपून काढले. यावेळी विद्युत वाहिनीवरील इलेक्ट्रीकल पिन इन्सूलेटरमध्ये बिघाड झाल्याने नागोठणे शहर व विभागातील वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना दसरा विजयादशमीच्या मंगलदिनी तब्बल आठ तास अंधारात चाचपडत राहावे लागले. मात्र, सहाय्यक अभियंता नितीन जोशी यांनी आपल्या सर्व कर्मचार्‍यांसह युद्ध पातळीवर दुरुस्तीचे काम पूर्ण करुन दसर्‍याच्याच रात्री साडेअकरा वाजता वीजपुरवठा सुरळीत करुन नागोठणेकरांना दिलासा दिला.

विजांमुळे वीज पुरवठा करणार्‍या विद्युत वाहिनीवरील पिन इन्सूलेटर डोंगराळ भागासह बर्‍याच ठिकाणी पंचर झाल्याने वीज पुरवठा खंडित झाला. मात्र, त्याचा शोध घेत माझा सर्व कर्मचार्‍यांच्या अथक परिश्रमाने पिन इन्सूलेटर बदलून संपूर्ण वीज पुरवठा सुरळीत करण्यात यश आले. ऐन पावसाळ्यात पूर परिस्थितीत विद्युत जनित्र जमिनीपासून अधिक उंचीवर नेऊन वीज पुरवठा सुरळीत सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला. आम्ही कधीही विनाकारण कोणतेही कारण नसताना वीज पुरवठा खंडित करत नाही. मात्र, पावसाळ्यात पडणार्‍या विजांमुळे उद्भवलेल्या अशाप्रकारच्या नैसर्गिक आपत्तीत नागरिकांनीही आम्हाला सहकार्य करावे अशी अपेक्षा आहे.

– नितीन जोशी, सहाय्यक अभियंता, नागोठणे

Exit mobile version