शॉर्टसर्किटमुळे वीजपुरवठा खंडित

ग्राहकांच्या तक्रारींकडे महावितरणचे दुर्लक्ष

| नेरळ | प्रतिनिधी |

उन्हाचा तडाखा वाढला असून, बहुसंख्य लोक घरात बसून पंख्याची हवा घेत उकाड्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करतात. मात्र, कर्जत तालुक्यात सर्वत्र वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यात प्रामुख्याने शॉर्टसर्किटमुळे वीजपुरवठा खंडित होत असल्याच्या ग्राहकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. दरम्यान, महावितरणकडून ग्राहकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केले जात असल्याने महावितरणविरुद्ध संताप व्यक्त होत आहे.

कर्जत तालुक्यात गेल्या महिन्याभरात प्रत्येक दिवशी वीजपुरवठा खंडित झाला आहे. त्यावेळी महावितरणकडे चौकशी करण्याचा प्रयत्न केला असता महावितरणकडून त्यांच्या कार्यालयातील दूरध्वनीवर संपर्क होत नाही. त्यामुळे वीज ग्राहक संतप्त झाले असून, वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा यामुळे महावितरण निरुत्तर होत असल्याने ग्राहक संतप्त आहेत. वारंवार खंडित होणार्‍या वीज पुरवठा बद्दल माथेरान येथील वीज ग्राहक जनार्दन पारटे यांनी महावितरणकडे पत्र पाठवून आपला संताप व्यक्त केला आहे. वीज विभगाचे मुख्यालय असलेल्या प्रकाश गड येथील मुख्य अभियंता यांना त्यांनी पत्र पाठवून आपली नाराजी व्यक्त केली आहे. काही तांत्रिक दोषामुळे शॉर्टसर्किटमुळे स्पार्किंग होत असते. दरम्यान, वीजपुरवठा खंडित न झाल्यामुळे आणि सतत होणार्‍या स्पार्किंगमुळे आग लागणे तसेच विजेच्या प्रवाहामधून काही वीज गळती झाल्यास जीवितहानी होण्याची दाट शक्यता असते.

दरम्यान, ही गंभीर बाब लक्षात घेऊन महावितरणचे मुख्य अभियंते आणि कर्मचारी वर्ग हे अनेक ठिकाणच्या फिडरवर 100 एंपियरचे सर्किट ब्रेकर न लावता थेट डायरेक्ट लाईन जोडतात. त्यामुळे शॉर्ट सर्किट झाल्यास त्या त्या विभागातील वीजपुरवठा त्वरित खंडित होत नाही. त्यामुळे हा लोड कळंबोली येथील एक्सप्रेस फिडर येतो आणि तेथील हेवी ड्युटी 800 एंपीयरचे आटो सर्किट बेकर ब्रेक होतात. त्यामुळे कर्जत, खालापूर, खोपोली या विभागतील वीजपुरवठा हा वारंवार खंडित होतो आहे. त्यास सर्वस्वी महाविरणचे अभियंते आणि लाईनमन जबाबदार आहेत, असा आरोप पारटे यांनी केला आहे. याप्रकरणी विभागातील महावितरणचे अधीक्षक अभियंता, मुख्य अभियंता, उपअभियंते, लाईनमन यांना जबाबदार धरून मुख्य सचिव यांनी या कामचुकार कर्मचारी वर्गावर नियमानुसार योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी जनार्दन पारटे यांनी आपल्या तक्रारी अर्जात केली आहे.

Exit mobile version