वसई अतिरिक्त सत्र तथा विशेष न्यायालयाचा निकाल
। कल्याण । वृत्तसंस्था ।
कंपनीकडून चोरी करण्यात आलेल्या वीजदेयकापैकी अर्धी रक्कम भरल्यानंतरच 48 तासात वीजपुरवठा पूर्ववत करण्याचा निकाल अतिरिक्त सत्र तथा विशेष न्यायालयाने दिला आहे. वीजचोरी प्रकरणी करण्यात आलेल्या कारवाईत खंडीत आलेला वीजपुरवठा पूर्वरत करण्याच्या मागणीसह, संबंधित कारवाईला आव्हान देणारी याचिका दोषी डायमंड आईस फॅक्टरीने दाखल केली होती. ही याचिका न्यायपीठाकडून फेटाळण्यात आली असून, न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.
वसई तालुक्यातील माजीवली येथील बर्फ बनवणार्या डायमंड आईस फॅक्टरी या उच्चदाब वीज ग्राहकाकडील वीजचोरी वसई मंडलाचे अधीक्षक अभियंता राजेशसिंग चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पथकाने 30 ऑक्टोबर 2021 ला उघडकीस आणली होती. रिमोटद्वारे वीजवापर नियंत्रित करणारे सर्कीट बसवून 59 महिन्यात या कारखान्याने 4 कोटी 93 लाख 98 हजार 460 रुपये किंमतीची 27 लाख 48 हजार 364 युनिट विजेची चोरी केल्याचे तपासणीत आढळले होते. वीजचोरीचे देयक न भरल्याने फक्टरीच्या संचालकांविरुद्ध विरार पूर्व पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर 3 नोव्हेंबरला वीजपुरवठा खंडित करण्यात आला.
यावर डायमंड आईस फक्टरीने वसई अतिरिक्त सत्र तथा विशेष न्यायालयात वीजचोरीच्या देयकाला आव्हान देऊन सुनावणीस विलंब लागणार असल्याने 8 लाख 54 हजार 860 रुपये भरून घ्यावेत व वीजपुरवठा जोडून देण्याची मागणी करणारा अर्ज केला. जिल्हा न्यायाधीश सुधीर देशपांडे यांच्यासमोर यासंदर्भात सुनावणी झाली. महावितरणकडून वकील अर्चना पाटील आणि विधी अधिकारी राजीव वामन यांनी सर्वोच्च व उच्च न्यायालयातील विविध निकालांचा संदर्भ देत युक्तिवाद करून अर्जदाराचे मुद्दे खोडून काढले.