| नवीन पनवेल | वार्ताहर |
मलेशिया (बहारो) येथे दि. 11 ते 18 डिसेंबरदरम्यान आंतरराष्ट्रीय आशियाई पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत ज्युनिअर गटात रायगड जिल्ह्याचा पॉवरलिफ्टर कुणाल सुभाष पिंगळे याने 53 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले होते. या कामगिरीबद्दल रायगड पॉवरलिफ्टिंग स्पोर्ट्स असोसिएशनकडून त्याचे निवासस्थानी जाऊन कौतुक करीत नुकताच सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी संघटनेचे वतीने सचिव अरुण पाटकर, कार्याध्यक्ष यशवंत मोकल, कार्यकारिणी सदस्य सुभाष टेंबे, संदीप पाटकर आणि कुणाल पिंगळे याचे वडील सुभाष परशुराम पिंगळे, आई राजश्री पिंगळे, काका एकनाथ पिंगळे, काकी पुष्पा एकनाथ पिंगळे आणि आजी सीताबाई परशुराम पिंगळे उपस्थित होत्या. कुणालने मिळविलेल्या यशाबाबत संघटनेने अभिनंदन करून भेटवस्तू दिली. यावेळी अरुण पाटकर यांनीसुद्धा वैयक्तिक भेटवस्तू देऊन कुणालला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कार्याध्यक्ष यशवंत मोकल यांनी कुणालने पॉवर लिफ्टिंग खेळापासून दूर न राहण्याची सूचना केली. संघटनेच्या पदाधिकार्यांनी घरी येऊन आपल्या मुलाचा सत्कार केल्याबद्दल कुणालच्या आईवडिलांनी समाधान व्यक्त केले.