। पोयनाड । वार्ताहर ।
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद रायगड अंतर्गत अलिबाग तालुकास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा वेश्वी-अलिबाग येथील पीएनपी शैक्षणिक संकुल येथे 14 व 15 नोव्हेंबर रोजी संपन्न झाल्या. या स्पर्धेत पोयनाड येथील कोएसो नाना पाटील हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचे 14,17,19 वर्ष वयोगट मुलांचे तर 19 वर्ष वयोगट मुलींचा संघ सहभागी झाले होते. या चारही गटात संबंधित संघांनी विजयी चौकार मारुन विभागातील कबड्डी या सांघीक खेळाचा लौकीक पुन्हा एकदा सिद्ध केला आहे.
मुलींच्या झालेल्या अंतिम फेरीच्या सामन्यात राज्यस्तरीय खेळाडूंचा सहभाग असलेल्या जेएसएम कॉलेज संघाचा पाडाव करुन अंतिम विजयी स्थान प्राप्त करतांना ज्योती, आकांक्षा, हर्षाली पाटील, वैदेही ठाकूर यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. तर मुलांच्या 19 व 17 वर्ष वयोगटात जनरल अरुण कुमार वैद्य विद्यालयाच्या संघांचा व 14 वर्ष वयोगटात स.म.वडके चोंढी संघाचा पराभव करुन तिहेरी अंतिम विजयी स्थान प्राप्त करतांना दिप हूजरे, बॉबी यादव, जय चव्हाण, मनिष पाटील, रतिश पाटील, अथर्व केणी, पारस शिद, तन्मय धुमाळ, आयुष पाटील, नयन मेंगाळ, कुणाल पाटील, पियुष पाटील यांची संपूर्ण स्पर्धेत खेळी निर्णायक होती.
संबंधित चार संघ जिल्हास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेत खेळी निर्णायक होती. संबंधित चार संघ जिल्हास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेकरीता अलिबाग तालुक्याचे नेतृत्व करणार आहेत. विद्यार्थी खेळाडू यांचा नियमित सराव, क्रीडा विभाग प्रमुख व प्रशिक्षक पुरुषोत्तम पिंगळे यांचे मार्गदर्शन व विद्यालयाचे मुख्याध्यापक के.के. फडतरे, यांचे क्रीडा विभागास प्रोत्साहन सार्थकी ठरले.