| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
गरीबांचे कैवारी, शेतकरी व कामगारांचे नेते, रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष स्व. प्रभाकर पाटील यांची शुक्रवारी (दि.23) रोजी अलिबागसह संपूर्ण जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी जयंती साजरी करण्यात आली. स्व. प्रभाकर पाटील यांच्या प्रतिमेस व पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी भाऊ तथा प्रभाकर पाटील यांच्या कार्याची माहिती देऊन त्यांच्या जुन्या आठवणींना अनेकांनी उजाळा दिला.
अलिबागमधील शेतकरी भवन येथील सभागृहात प्रभाकर पाटील यांची जयंती साजरी करण्यात आली. त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून कार्यकर्त्यांनी अभिवादन केले. रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघ व स्व. प्रभाकर पाटील सांस्कृतिक कला मंचच्या वतीने प्रभाकर पाटील यांची अलिबागमध्ये जयंती साजरी करण्यात आली. यावेळी स्व. प्रभाकर पाटील सांस्कृतिक कला मंचचे अध्यक्ष सखाराम पवार यांच्या हस्ते प्रभाकर पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष नागेश कुळकर्णी, ज्येष्ठ नाट्यकर्मी शरद कोरडे, आर.सी. घरत, नंदू थळकर, कवी विनोद टेंबूलकर, प्रभाकर पाटील वाचनालयातील कर्मचारी झेबा कुरेशी आदी मान्यवर, कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी नागेश कुलकर्णी यांच्यासह अनेक मान्यवरांनी स्व. प्रभाकर पाटील यांच्या कार्याची माहिती देत जुन्या आठवणींना उजाळा दिला. रायगड जिल्हा परिषदेच्या वतीनेदेखील प्रभाकर पाटील यांची जयंती साजरी करण्यात आली. जिल्हा परिषदेच्या आवारात असलेल्या प्रभाकर पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. जिल्ह्यातील तालुका चिटणीस व शैक्षणिक, कला, सांस्कृतिक सामाजिक अशा वेगवेगळ्या संस्थेच्या वतीने प्रभाकर पाटील यांच्या पुतळ्यास व प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
अलिबाग नगरपरिषदेच्या कार्यालयात स्व. प्रभाकर पाटील, सुभाष चंद्रबोस आणि हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली. यावेळी अलिबागच्या नगराध्यक्ष अक्षया नाईक, उपनगराध्यक्षा ॲड. मानसी म्हात्रे, नगरसेवक प्रशांत नाईक, शेकाप कामगार आघाडीचे प्रमुख प्रदीप नाईक, नगरसेवक संतोष गुरव, संध्या पालवणकर, सुषमा पाटील, साक्षी पाटील, आनंद पाटील, ॲड. निवेदिता वाघमारे, समीर ठाकूर, ॲड. ऋषीकेश माळी, ॲड. अश्विनी ठोसर, ॲड. नीलम हजारे, अनिल चोपडा, योजना पाटील, सागर भगत, शैला भगत, वृषाली भगत आदी उपस्थित होते.





