माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्यासह जिवाची होतीया काहिलीमधील कलाकारांची विशेष उपस्थिती
। अलिबाग । प्रतिनिधी ।
गणेश वंदना, लग्नगीत, आई एकविरेची महती सांगणारे गाणे अशा लोकनृत्याच्या आविष्कारातून करण्यात आलेला संस्कृतीचा जागर आणि महागरब्याने कार्यक्रमाला खर्या अर्थाने रंगत आली. ज्यामुळे विद्यार्थी, पालक, शिक्षक यांच्या चेहर्यावरील उत्साह, आनंद ओसंडून वाहत होता. शेवटच्या दिवशी अशा जल्लोषपूर्ण वातावरणात पीएनपी संकुलातील प्रभाविष्काराची यशस्वी सांगता झाली.
प्रभाकर पाटील एज्युकेशन सोसायटीच्या वेश्वी येथील संकुलाद्वारे आयोजित प्रभाविष्काराची शुक्रवारी सांगता झाली. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, पीएनपीच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील, जिवाची होतीया काहिलीफ फेम अभिनेते राज हंचनाळे, अभिनेत्री प्रतीक्षा शिवकर, शेकाप तालुका चिटणीस अनिल पाटील, माजी नगरसेवक अनिल चोपडा, माजी पं.स. सदस्य सुभाष वागळे, रामराजचे माजी सरपंच मोहन धुमाळ, वेश्वीच्या उपसरपंच आरती पाटील, नगरसेविका अश्विनी पाटील, वृषाली ठोसर, संजना कीर, डॉ. राजेंद्र चांदोरकर, डॉ. वाझे, प्रा. विक्रांत वार्डे, प्र. प्राचार्य ओमकार पोटे, विशेष कार्यकारी अधिकारी संजय मिर्जी, प्रा. रवींद्र पाटील, प्रा. पल्लवी पाटील आदींसह मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करण्यात आले. त्यानंतर कार्यक्रास सुरुवात करण्यात आली. यावेळी सोनी टीव्ही वाहिनीवरील जिवाची होतीया काहिली या मालिकेतील कलाकारांची उपस्थिती आकर्षण ठरली. या कलाकारांनी मुलांसोबत विविध नृत्य सादर करीत कार्यक्रमात रंग भरले.
यावेळी संस्थेच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील यांनी मनोगत सादर केले. त्यांनी पीएनपीच्या सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या मेहनतीचे कौतुक केले. प्रभाविष्काराच्या यशस्वी आयोजनासाठी मनापासून मेहनत घेतल्यामुळेच हा सोहळा यशस्वी होऊ शकला, असे उद्गार त्यांनी काढले. तसेच प्रभाविष्कारात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलागुणांचे त्यांनी भरभरुन कौतुक केले. जेव्हा तुम्ही मुलांना प्रोत्साहित करुन त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारता, तेव्हा त्यांना प्रचंड प्रोत्साहन मिळते, असे मत त्यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमास विद्यार्थ्यांसह मोठ्या संख्येने पालकही उपस्थित होते. तसेच महागरब्याचे लकी ड्रॉ काढण्यात आले.
राज, प्रतीक्षाचा कोळी गीतावर ठेका
जिवाची होतीया काहिली फेम राज हंचनाळे व प्रतीक्षा शिवकर यांनी कोळीगीतावर मनसोक्त केलेले नृत्य विशेष लक्षवेधी ठरले. कलाकारांसोबत बेधूंदपणे कला सादर करणार्या या कलाकारांना उपस्थित रसिकांनी भरभरुन दाद दिली.
या पंचरत्नांचा सन्मान
पीएनपीच्या माध्यमातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. यामध्ये कला विभागात विराज म्हात्रे तसेच सातवीतील सान्वी निर्गुळे, सामाजिक विभाग अरमान सय्यद, मानसी नागरे, शैक्षणिक विभाग संयुक्ता हजरे, पृथा रत्नाकर पाटील, क्रीडा विभाग संदीप पाल, आसावरी गावंड, साहित्य विभाग महेश नायकुडे, निशिका पाटील यांचा सन्मान करण्यात आला.