| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना मॅग्नस कार्लसन याने जिंकला आहे. भारताच्या आर. प्रज्ञानानंद याला टायब्रेकर सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. मंगळवार आणि बुधवारी झालेल्या दोन्ही क्लासिक गेम अनिर्णित सुटल्या होत्या, त्यामुळे गुरुवारी टायब्रेकरमध्ये सामना खेळवण्यात आला. यामध्ये कार्लसन याने बाजी मारली. कार्लसन याला प्रज्ञानानंद यानी कडवी टक्कर दिली. पण त्यात कडवी झुंज देऊनही अपयश आले. मात्र त्याच्या खेळीने हरुनही तो जिंकला, अशीच भावना तमाम भारतीयांच्या मनात निर्माण झाली.
टायब्रेकरमध्ये विजेता ठरवण्यासाठी 25-25 मिनिटांचे दोन सामने खेळवण्यात येतात. यातील पहिला टाय ब्रेकर सामना कार्लसन याने जिंकला होता. दुसरा सामना प्रज्ञानंद याला जिंकणं अनिवार्य होते. पण पहिल्या सामन्यात विजय मिळवणाऱ्या कार्लसन याचा आत्मविशावस वाढला होता. त्याने दुसऱ्या सामन्यात आपला खेळ आणखी उंचावला, त्याला प्रज्ञानानंद याच्याकडून कडवी टक्कर मिळाली, पण दुसरा सामना अनिर्णित राहिला. अखेर कार्लसन बुद्धिबळाचा नवा विश्वकप विजेता झाला.
प्रज्ञानानंद याने पाच वेळच्या विश्वविजेत्या कार्लसन याच्यापुढे आपल्या सर्वोच्च खेळाचे प्रदर्शन केले. 32 वर्षांच्या कार्लसन याने 2004 मध्ये ग्रँडमास्टर हा खिताब मिळवला तेव्हा प्रज्ञानानंद याचा जन्मही झाला नव्हता. प्रज्ञानानंद याचा जन्म 2005 मधील आहे. त्यामुळे या दोघांमधील लढाई विषम पातळीवरील असल्याचे दिसतेय. प्रज्ञानानंद आणि कार्लसन यांच्यातील सामना रंगतदार झाला, पण अखेर अनुभवाने बाजी मारली.