। अलिबाग । प्रतिनिधी ।
ताडवागळे येथे 10 वी 12 वी विद्यार्थी गुणगौरव व करीअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सरपंच रूपाली शिर्के व उपसरपंच शैलेश पाटील व सदस्य यांच्या प्रयत्नाने झालेल्या या कार्यक्रमास प्रतिसाद लाभला. कार्यक्रमास अतुल वैद्य कृष्णा नागेश दांडेकर, निशांत शैवतेला, सुशिल साईकर, सिमरन राऊत यांनी उपस्थित विद्यार्थी पालक आणि ग्रामस्थ यांना मार्गदर्शन केले. यावेळी अतुल वैद्य यांनी विद्यार्थ्यांसाठी ग्रंथालय निर्माण करण्यात यावे असे सुचविले. तसेच मार्गदर्शक कृष्णा दांडेकर सर यांनी विद्यार्थ्यांना करीयर बरोबरच चारित्र्य संपन्नता जिवनात किती महत्त्वाची आहे. हे सांगून त्यासाठी वाचनालयासाठी 50 हजाराची देणगी देण्याचे जाहीर केले. तसेच ग्रंथालयासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घ्यावा असे आवाहन केले असता उपसरपंच शैलेश पाटील यांनी माजी सरपंच दनानाथ हिराजी पाटील यांच्या नावे ग्रंथालयास सुरू करण्यासाठी स्वतःची जागा उपलब्ध करून देण्याचे जाहीर केले. कार्यक्रमाची सांगता गुणवंत विद्यार्थ्यांना सोनाचाफ्याचे रोपटे भेट देऊन उपस्थितांचे आभार मानून करण्यात आली.