| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
कर्नाटकच्या हासन लोकसभेचे माजी खासदार आणि देशाचे माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचे नातू प्रज्ज्वल रेवण्णा (34) यांना बलात्कार प्रकरणात दोषी ठरविण्यात आले आहे. कर्नाटकच्या विशेष न्यायालयाने शुक्रवारी हा निकाल दिला. घरकाम करणाऱ्या 47 वर्षीय महिलेवर रेवण्णा कुटुंबाच्या फार्महाऊसमध्ये बलात्कार केल्याप्रकरणी प्रज्ज्वल रेवण्णांना दोषी ठरवले गेले आहे.
2 ऑगस्ट रोजी न्यायालय शिक्षा सुनावणार आहे. न्यायालयाने शुक्रवारी आपला निकाल सुनावताच प्रज्ज्वल रेवण्णा यांना न्यायालयातच रडू कोसळले. 2024 मध्ये प्रज्ज्वल रेवण्णा यांच्या व्हायरल व्हिडीओचे प्रकरण समोर आले होते. कर्नाटकमध्ये मतदान पार पडताच सदर प्रकरण बाहेर आल्यामुळे एकच गदारोळ उडाला होता. या प्रकरणात गुन्हा नोंद झाल्यानंतर आता 14 महिन्यांनी न्यायालयाने निकाल दिला आहे. माजी खासदार प्रज्ज्वल रेवण्णावर बलात्काराची चार प्रकरणे दाखल झाली आहेत. त्यापैकी एका प्रकरणात त्याला दोषी ठरविण्यात आले आहे. 47 वर्षीय घरकाम करणाऱ्या महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी दोषी ठरविले गेले आहे.
प्रज्ज्वल रेवण्णा प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने विशेष तपास पथक स्थापन केले होते. या पथकाने 120 साक्षीदारांचे जबाब नोंदविले. तसेच पीडितांच्याही तक्रारी घेऊन महत्त्वपूर्ण पुरावे गोळा केले आहेत. याआधारावर प्रज्ज्वलवर विविध गुन्हे दाखल केले होते.







