विष्णुदास भावे गौरवपदक पुरस्काराने होणार सन्मानित
। सांगली। वृत्तसंस्था ।
अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समिती, सांगली यांच्या वतीने देण्यात येणारा आणि नाट्यक्षेत्रात अतिशय प्रतिष्ठेचा मानला जाणारा यंदाचा विष्णुदास भावे गौरवपदक पुरस्कार प्रशांत दामलेंना जाहीर करण्यात आला आहे. प्रसिद्ध रंगभूमी कलाकार, ज्येष्ठ नाटककार, दिग्दर्शक, अभिनेते प्रशांत दामले यांना हा पुरस्कार प्रदान केला जाईल, अशी माहिती अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. शरद कराळे यांनी दिली.
मराठी रंगभूमी गाजवणाऱ्या कलाकारांच्या यादीमध्ये ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. दामले यांनी रंगभूमीवर विविध प्रयोग यशस्वी करुन दाखवले आहेत. केवळ भारतातच नव्हे तर भारताबाहेरही मराठी नाटकांचा डंका वाजण्यात प्रशांत दामले यांचा मोठा वाटा आहे. रंगभूमिची त्यांनी केलेली सेवा पाहता यंदाचा एक मानाचा पुरस्कार रंगकर्मी प्रशांत दामले यांना जाहीर झाला आहे.
दरम्यान, हा सन्मान खास दिवशी त्यांना प्रदान केला जाईल. पुढील महिन्यात रंगभूमी दिनी अर्थात दि.5 नोव्हेंबर रोजी सांगलीतील विष्णूदास भावे नाट्य विद्यामंदिर याठिकाण दामले यांना सन्मानित करण्यात येणार आहे. रंगभूमीची प्रदीर्घ सेवा करणाऱ्या श्रेष्ठ कलावंतांना विष्णूदास भावे गौरव पदकाने सन्मानित करण्यात येते आणि यंदाचे मानकरी असणाऱ्या प्रशांत दामले यांनी तर रंगभूमीची अविरत सेवा केली आहे. दरम्यान, या यंदा समारंभाचे हे 55 वे वर्ष आहे.