नेरळचा योगेश बारशी बेस्ट पोझर
। रेवदंडा । प्रतिनिधी ।
जिल्हा बॉडी बिल्डर असोसिएशन व माजी अलिबाग पंचायत समिती सदस्य श्रीधर भोपी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रायगड श्री 2021 शरीरसौष्ठव स्पर्धेत अलिबागचा प्रकाश कावजी रायगड श्री 2021चा मानकरी ठरला तर बेस्ट पोझरचा किताब नेरळ येथील योगेश बारशी याने पटकावला.
अलिबाग तालुक्यात बेलोशी येथील राजिप शाळेच्या प्रांगणात 24 नोव्हेंबर रोजी रात्री आठ वाजता माजी आ.मधुकर ठाकूर यांच्या स्मरणार्थ अलिबाग पंचायत समितीचे माजी सदस्य श्रीधर भोपी यांच्या वाढदिवसानिमित्त रायगड श्री 2021 शरीरसौष्ठव स्पर्धा जिल्हा बॉडी बिल्डर असोसिएशनच्या माध्यमातून व जोशी फिटनेस सेंटर वावे व कुलस्वामिनी मित्रमंडळ बेलोशी यांच्या सहकार्याने घेण्यात आली. या स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील नामवंत व्यायामशाळेतील शरीरसौष्ठव स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धकांमध्ये अलिबाग, उरण, पेण, कर्जत, नेरळ, पनवेल, मुरुड, महाड, खोपोली, रोहा आदी ठिकाणांहून स्पर्धकांचा समावेश होता. या स्पर्धेचा प्रारंभ आमदार अनिकेत तटकरे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.
पाच गटातील प्रथम विजेत्या स्पर्धकांमध्ये रायगड श्री 2021साठी स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये अलिबाग डिव्हीने एनर्जी व्यायामशाळेचा प्रकाश कावजी रागयड श्री 2021 चा मानकरी ठरला तर नेरळच्या बलित क्लबचा योगेश बारशी यांनी बेस्ट पोझरचा किताब पटकाविला. स्पर्धेच्या बक्षिस वितरण कार्यक्रम माजी अलिबाग पंचायत समिती सदस्य श्रीधर भोपी, बेलोशी ग्रामपंचायत सरपंच कृष्णा भोपी, मान्यवराचे हस्ते संपन्न झाला. स्पर्धा संपन्न होण्यासाठी जोशी फिटनेस सेंटर वावे, व कुलस्वामिनी मित्रमंडळ बेलोशी व राकेश भोपी व सहकारी यांनी विशेष परिश्रम घेतले.