बेलकडे ग्रामस्थांसाठी अभिमानाचा क्षण
| अलिबाग | प्रतिनिधी |
तालुक्यातील बेलकडे गावचा सुपुत्र प्रथमेश विकास पाटील याची भारतीय सीमा सुरक्षा दलात (बीएसएफ) कॉन्स्टेबल पदावर नियुक्ती झाली आहे. ही बाब संपूर्ण बेलकडे गावासाठी तसेच तालुक्यासाठी अभिमानास्पद ठरली आहे.
प्रथमेशला लहानपणापासूनच देशसेवेची ओढ होती. जिद्द, चिकाटी आणि अपार मेहनतीच्या जोरावर त्याने हे यश संपादन केले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही त्याने आपले बी.एस्सी. पदवीचे शिक्षण पूर्ण केले. कोणतेही विशेष मार्गदर्शन नसताना स्वतःच्या कष्टावर त्याने सैन्यदलात भरती होण्याचे स्वप्न उराशी बाळगले आणि ते सत्यात उतरवले. त्याच्या या यशामागे कुटुंबियांचा मोठा पाठिंबा लाभला. विशेषतः आई-वडिलांनी त्याच्या विचारांना नेहमीच प्रोत्साहन दिले. आपल्या गावातील तरुण भारतमातेच्या सेवेसाठी जाणार याचा समस्त बेलकडे ग्रामस्थांना आनंद झाला असून, त्यांनी प्रथमेशचा जाहीर सत्कार केला. दरम्यान, बेलकडे ग्रामस्थांकडून ऋषिकेश पाटील यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन हा सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रामस्थ, युवक व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रथमेश पाटील हा बेलकडे गावातील सैन्यदलात सामील होणारा दुसरा युवक ठरला आहे. यापूर्वी ॠषिकांत पाटील यांनी 17 वर्षे इतकी प्रदीर्घ सेवा सैन्य दलात केली होती. आज ते निवृत्त असले तरी त्यांचा आदर्श प्रथमेश पाटील याच्यासाठी प्रेरणादायी ठरला आहे.
तरुणांसाठी प्रेरणादायी
प्रदीर्घ तयारीनंतर बेलकडे गावातून देशसेवेची उमेद घेऊन प्रथमेश पाटील पुढे आला आहे. सुरुवातीपासूनच सैन्यात जाण्याची त्याची इच्छा होती. ही जिद्द केवळ गावापुरती मर्यादित न राहता तालुक्यातील तरुणांसाठीही प्रेरणास्थान ठरत आहे. आपल्याला मोठे होऊन काय करायचे आहे, याचा विचार शालेय जीवनातच केला पाहिजे, अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.
देशसेवा करण्याचे स्वप्न मी लहानपणापासून पाहत होतो. जिद्द, मेहनत आणि सातत्य ठेवल्यास कोणतेही ध्येय अशक्य नाही, यावर माझा ठाम विश्वास आहे. या प्रवासात आई-वडील, कुटुंबीय, शिक्षक, मित्र आणि बेलकडे गावातील सर्व ग्रामस्थांनी मला वेळोवेळी मोलाचे मार्गदर्शन व पाठबळ दिले. त्यांच्या आशीर्वादामुळेच आज मला भारतीय सीमा सुरक्षा दलात सेवा करण्याची संधी मिळाली आहे. देशासाठी प्रामाणिकपणे व निष्ठेने सेवा करण्याचा माझा संकल्प आहे.
-प्रथमेश विकास पाटील






