। पुणे । वृत्तसंस्था ।
बारामतीमधील निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असतानाच ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या बॅगेची तपासणी; तसेच पवार यांंच्या पत्नी प्रतिभा पवार आणि नात, खासदार सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती सुळे यांना प्रचारासाठी बारामती टेक्सटाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखण्यात आल्याच्या घटनांंचे तीव्र पडसाद बारामतीत उमटले. या घटनांनी बारामतीतील राजकीय वातावरण तापल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवार या बारामती टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षा आहेत. प्रतिभा पवार या बारामतीचे राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे उमेदवार युगेंद्र पवार यांच्या प्रचारात सक्रिय झाल्या आहेत. प्रतिभा पवार आणि रेवती सुळे या प्रचारासाठी टेक्सटाईल पार्क येथे मोटारीतून आल्या. त्यावेळी त्यांना आत जाण्यापासून रोखण्यात आले. पार्कचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सूचनेनुसार प्रवेशद्वार बंद करण्यात आल्याचे सुरक्षारक्षकाने सांगितले. त्यांना अर्धा तास प्रवेशद्वारावर थांबविण्यात आले. याबाबतची ध्वनिचित्रफीत खासदार सुप्रिया सुळे यांंच्या कार्यालयाकडून प्रसारित करण्यात आली. त्यानंतर या घटनेचे तीव्र पडसाद मतदार संघात उमटले.
तत्पूर्वी, ज्येष्ठ नेते शरद पवार हे प्रचारासाठी चालले असताना बारामतीतील हेलिपॅडवर निवडणूक अधिकार्यांकडून पवार यांच्या बॅगांची तपासणी करण्यात आली. बॅगांची तपासणी होत असताना पवार शांतपणे उभे होते. सोलापूर येथे प्रचार सभेसाठी जाताना हा प्रकार झाला. या दोन्ही घटनांचे पडसाद बारामतीच्या राजकारणात उमटले असून त्याबाबत चर्चा सुरू झाली आहे.