पनवेल आगारात 26 जुलैला प्रवासी राजा दिन

| पनवेल | वार्ताहर |

महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळाच्यावतीने 15 जुलैपासून प्रवाशांच्या समस्या, तक्रारीवजा सूचना यांचे स्थानिक पातळीवर जलदगतीने निराकरण होण्याच्या उद्देशाने प्रत्येक आगारात दर सोमवारी व शुक्रवारी प्रवासी राजा दिन व कामगार पालक दिन आयोजित करण्यात येणार आहे. या उपक्रमास विभाग नियंत्रक आगारात जाऊन प्रवाशांच्या व रा.प. कर्मचार्‍यांच्या समस्या, तक्रारी व सूचना ऐकून घेतील. त्या तातडीने सोडविण्याच्यादृष्टीने उपाययोजना करतील. त्यामुळे प्रवाशांचे समाधान होऊन प्रवासी सेवेचा दर्जा व गुणवत्ता वाढण्यास मदत होईल.

पनवेल येथे शुक्रवारी (दि. 26) आणि उरण येथे सोमवारी (दि. 29) रा.प. आगारात सकाळी 10 ते 2 या वेळेत प्रवासी राजा दिन साजरा करण्यात येणार आहे. यावेळेत प्रवासी, प्रवासी संघटना, शाळा, महाविद्यालये आपल्या समस्या, तक्रारी सूचना लेखी स्वरुपात मांडू शकतात. प्रवासी राजा दिन झाल्यानंतर दुपारी 3 ते 5 या वेळेत कामगार पालक दिन साजरा करण्यात येणार असून, या वेळेत संघटना व रा.प. कर्मचार्‍यांच्या वैयक्तिक बाबतीतील प्रश्‍न (रजा मंजुरी, कर्तव्यासंबंधी, वेळापत्रकासंबंधी व तत्सम तक्रारी) लेखी स्वरूपात घेऊन तक्रारीचे तात्काळ निराकरण करतील. तरी सर्व प्रवासी बंधू-भगिनींनी व रा.प. कामगारांनी याचा लाभ घेऊन आपल्या समस्यांचे निराकरण करुन घ्यावे, असे एस.टी. महामंडळ रा.प. मुंबई विभागामार्फत आवाहन करण्यात येत आहे.

Exit mobile version