मुरूडमध्ये कोलंबीची आवक वाढली

। मुरूड जंजिरा । वार्ताहर ।
समुद्रात निवात आल्याने मुरूड किनार्‍यावर कोलंबी मासळी मोठ्या प्रमाणावर मिळण्यास सुरुवात झाली आहे. मंगळवारी मुरूड मार्केट सर्वत्र लाल रंगाची कोलंबी दिसून येत होती. समुद्रात निवात येणे म्हणजे उसळलेले समुद्राचे पाणी हळूहळू शांत होत जाते. त्यावेळी मासळी किनारी भागात खर्‍या अर्थाने येण्यास सुरुवात होते अशी माहिती मुरूड येथील ज्येष्ठ मच्छिमार तथा सागरकन्या मच्छीमार सोसायटीचे व्हाईस चेअरमन मनोहर मकु यांनी दिली.
गणेशोत्सवाची सांगता झाल्यानंतर उसत्वासाठी आलेल्या मच्छिमारांनी जाळी भरून मासेमारीस जाण्यासाठी पुन्हा सज्जता केली असतानाच पुन्हा पावसाचे विघ्न उभे ठाकले आहे. तरीही काही मासेमारी नौका नाईलाजाने मासेमारीस गेल्या आहेत. या पावसात वादळी वारे दिसून येत नसून संततधार पाऊस सुरू आहे. कोलंबी भरपूर प्रमाणात आल्याने 100 रुपये असणारा वाटा 40 ते 50 रुपयाला मिळत आहे. कोलंबीच्या सिझन नंतर पापलेट, कुपा, सोलट, घोळ अशी मोठी मासळी देखील या सिझ मध्ये मिळू शकते, अशी माहिती मनोहर मकु यांनी दिली.

Exit mobile version